'येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये न्या अर्णब गोस्वामीला'; कोणी केली ही टीका?

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 23 April 2020

अर्णब गोस्वामीला कोरोनाचं संकट संपेपर्यंत येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये क्वारंटाइन करावं. तिथं त्यांच्या मेंदूशी संबंधित सर्व चाचण्याही कराव्यात. जर त्यांच्यात काही सुधारणा झाली तर आणि तरच त्यांना समाजात मिसळू द्यावं.

मुंबई : रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी पालघर घटनेला धार्मिक रंग देऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संदर्भात हीन पातळीवर जाऊन केलेले विधान अत्यंत निंदनीय आहे. किंबहुना संपूर्ण देश कोरोनाविरोधात लढत असताना अशी भडकाऊ वक्तव्य करून देशात धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न गोस्वामी करत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना साथीमुळे देशाची परिस्थिती बिकट झाली आहे. विशेषतः मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात हे संकट मोठं आहे. मुंबईत तर दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक होत आहे. अशा परिस्थितीत जात, धर्म, पक्ष विसरून एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. पण काही लोक, विशेषतः भारतीय जनता पक्षातले विशिष्ट लोक, अर्णब गोस्वामी सारखे पत्रकार या राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

- Coronavirus : भारतीय पुरुष का ठरताहेत कोरोनाचे सर्वाधिक बळी? 'ही' आहेत त्याची कारणे

कधी खोट्या बातम्या पेरून तर कधी दंगलींसदृश्य वातावरण निर्माण करून धार्मिक विद्वेष पसरवण्याचं ते काम करत आहेत. त्यातून धार्मिक ऐक्याला तडा जातो आहे. अशा लोकांना वेळीच रोखलं नाही, तर त्याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागणार आहेत, असा गंभीर इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी यांनी दिला आहे. 

यासंदर्भात बोलताना जोशी म्हणाले की, प्रत्येकाचं आरोग्य हा देशासमोर असलेला प्राधान्याचा विषय आहे. परंतु त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून पालघरमध्ये घडलेल्या घटनेला विनाकारण धार्मिक आणि जातीय रंग देण्याचा प्रयत्न सातत्यानं होताना दिसतो आहे. त्यासाठी एक गट सक्रिय झालेला आहे. या सगळ्याचा कहर म्हणावं की काय असं अर्णब गोस्वामीचे विधान आहे. खरंतर अर्णब गोस्वामीची आजपर्यंतची अशी शाब्दिक गरळ, केलेली टीका आपण सहन केली.

- Breaking : राज्यात दिवसभरात विक्रमी संख्येत आढळले कोरोना रुग्ण; साडेसहा हजाराचा टप्पा गाठला!

कारण आपल्या देशात लोकशाही आहे. पण या टीकेनं आज सगळ्याच पातळ्या ओलांडल्या आहेत. त्यावर व्हायची ती कायदेशीर कारवाई होईलच. पण ज्याप्रमाणे कोरोना बाधित माणसाच्या संपर्कात आलेल्यांना माणसाला क्वारंटाईन केलं जातं. त्याला समाजात मिसळू दिलं जात नाही. तसंच अशी विधानं करणाऱ्या अर्णबसारख्या वेड्या माणसाला समाजात मिसळू देणं हे चुकीचं ठरेल. कारण कोरोनापेक्षा भयंकर असलेल्या धार्मिक विद्वेषाचा विषाणू पसरविण्यात हा माणूस पारंगत आहे. 

त्यामुळेच माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की, अर्णब गोस्वामीला कोरोनाचं संकट संपेपर्यंत येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये क्वारंटाइन करावं. तिथं त्यांच्या मेंदूशी संबंधित सर्व चाचण्याही कराव्यात. जर त्यांच्यात काही सुधारणा झाली तर आणि तरच त्यांना समाजात मिसळू द्यावं.

- मोठी बातमी : राज्यातील 64 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग

अर्थात ती शक्यता धूसर आहे. त्यामुळंच देशावरचं, राज्यावरचं कोरोनाचं संकट लक्षात घेता, धर्माधर्मांमध्ये भांडणं लावण्याच्या अर्णब गोस्वामीच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आणि पुन्हा एकदा त्याला येरवड्यातील वेड्यांच्या इस्पितळात क्वारंटाइन करण्याची विनंती करतो, असे जोशी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Maharashtra Pradesh General Secretary Mohan Joshi criticized Arnab Goswami