पक्षपातळीवर शांतता; इच्छुक मात्र गाठीभेटींवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रदेश काँग्रेसची बैठक येत्या आठवडाभरात होणार आहे. या बैठकीत पक्षाला कोणत्या आणि किती जागा मिळणार, याबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे पक्षाच्या पातळीवर जरी शांतता असली, तरी इच्छुक उमेदवारांनी मात्र आपल्यापरीने प्रयत्न सुरू केले असून, त्यांच्याकडून गाठीभेटींवर भर देण्यात येत आहे.

विधानसभा 2019 : 
पुणे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रदेश काँग्रेसची बैठक येत्या आठवडाभरात होणार आहे. या बैठकीत पक्षाला कोणत्या आणि किती जागा मिळणार, याबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे पक्षाच्या पातळीवर जरी शांतता असली, तरी इच्छुक उमेदवारांनी मात्र आपल्यापरीने प्रयत्न सुरू केले असून, त्यांच्याकडून गाठीभेटींवर भर देण्यात येत आहे.

भाजप-शिवसेनेची विधानसभा निवडणुकीत युती होणार की नाही, हे अद्याप अनिश्‍चित आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी शहरातील आठही मतदारसंघांतील  इच्छुकांच्या मुलाखती घेऊन यादी प्रदेश पातळीकडे पाठविली आहे. गेल्या महिन्यात आघाडीची बैठक होणे अपेक्षित होते; परंतु सांगली-कोल्हापूर येथील पूरस्थिती, त्यानंतर पक्षाला रामराम ठोकणाऱ्यांची वाढत चाललेली संख्या आदी 

कारणांमुळे ही बैठक होऊ शकली नाही. त्यातच वंचित बहुजन विकास आघाडीबरोबर देखील काँग्रेसच्या वाटाघाटी सुरू होत्या. त्यामुळे काँग्रेसने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याने प्रदेश काँग्रेसची बैठक लांबणीवर पडली. आता मात्र ही बैठक या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे.

काँग्रेसकडून शहरातील आठही जागांवर दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात पक्षाच्या वाट्याला कोणत्या आणि किती जागा येणार, हे या बैठकीत निश्‍चित होईल. मात्र आठही मतदारसंघांतील इच्छुकांनी स्वत-च्या स्तरावर मतदार संघात संपर्क मोहीम हाती घेतली आहे. त्यातच गणेशोत्सवाला सुरवात होत असल्यामुळे त्या निमित्ताने इच्छुकांकडून मतदारांच्या गाठीभेटींवर भर देण्यात येत आहे. 

वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न 
पक्षाकडून काढण्यात आलेली महापर्दाफाश यात्रा पुण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने शहरातील वातावरण ढवळून काढण्याचे नियोजन शहर काँग्रेसकडून सुरू आहे. त्यांच्या नियोजनासाठी नुकतीच शहर काँग्रेसची बैठक झाली. त्यामध्ये काँग्रेसने काय केले, यांची माहिती मतदारांपर्यंत पोचविण्याबरोबरच भाजपने जनतेची कशी फसवणूक केली, याच्या लेखाजोखा पक्षाकडून जनतेसमोर मांडला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress meeting will be held within a week for Assembly elections