Vidhan Sabha 2019 : भाजप, दलबदलू नेत्यांवर थरूरास्त्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

‘‘राष्ट्रभाषा ही राष्ट्रवादाशी जोडण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे, त्यामुळे देशाच्या एकतेला धोका आहे. भाजपला अपेक्षित असलेले हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुस्तानचा नारा देशाला फायदेशीर नाही. श्रीरामाचे नाव घेऊन एखाद्याला मारणे हे हिंदुत्व नाही. या हिंदुत्वाची श्रीरामालादेखील लाज वाटेल,’’ अशी टीका काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी रविवारी केली.

विधानसभा 2019
पुणे - ‘‘राष्ट्रभाषा ही राष्ट्रवादाशी जोडण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे, त्यामुळे देशाच्या एकतेला धोका आहे. भाजपला अपेक्षित असलेले हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुस्तानचा नारा देशाला फायदेशीर नाही. श्रीरामाचे नाव घेऊन एखाद्याला मारणे हे हिंदुत्व नाही. या हिंदुत्वाची श्रीरामालादेखील लाज वाटेल,’’ अशी टीका काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी रविवारी केली.

ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात थरूर बोलत होते. या वेळी पक्षाचे प्रवक्ते संजय झा, शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, अभय छाजेड, सदानंद शेट्टी आदी उपस्थित होते.

केंद्रातील भाजप सरकारची कार्यपद्धती, हिंदी भाषेचा धरला जाणारा आग्रह, यावर टीका करतानाच काँग्रेसची ध्येयधोरणे थरूर यांनी मांडली. ते म्हणाले, ‘‘मीसुद्धा हिंदू आहे. त्याचा मला अभिमान आणि गर्व आहे. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला जो हिंदू अपेक्षित आहे, तो मला मान्य नाही. हिंदू आणि हिंदुत्वाचे नाव घेऊन हिंदू धर्माला बदनाम करण्याचे काम सुरू आहे.’’

‘‘राष्ट्रभाषा ही राष्ट्रवादाशी जोडण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. राष्ट्रभाषेतूनच व्यवहार केले पाहिजेत, या आग्रहामुळे सिंग, शर्मा, शुक्‍ला खूष होतील; पण सुब्रह्मण्यम, अय्यर, पिल्ले यांचे काय? त्यांना वेगळी भाषा शिकावी लागेल. देशावर एकच भाषा लादणे, हे एकतेला धोका निर्माण करणारे आहे.’’ सर्वमान्य भारत घडविण्याचे काँग्रेसचे ध्येय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वतंत्र्यानंतरही काँग्रेसची ही भूमिका राहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेला हेच अपेक्षित आहे, असे सांगून थरूर म्हणाले, ‘‘जाती-धर्मावरून भेद करणे योग्य नाही. ही देशाची संस्कृती आहे आणि काँग्रेसचीदेखील. महात्मा गांधींच्या विचारावर चालणारी काँग्रेस आहे.’’

सोईस्कर विचार हायजॅक
स्वातंत्र्यपूर्व काळात सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार थोडे हिंदुत्ववादाकडे झुकणारे होते, असे सांगून थरूर म्हणाले, ‘‘पण देश स्वतंत्र झाल्यानंतर पटेल यांनादेखील गांधीवादाचे महत्त्व पटले. गांधीवाद हाच खरा राष्ट्रवाद असल्याचे त्यांना जाणवले. परंतु, भाजपकडून जाणीवपूर्वक काही गोष्टी लपविल्या जात आहेत. त्यांना पटेल, महात्मा गांधी यांचे जे सोईस्कर विचार आहेत, तेवढेच हायजॅक करण्याचे काम सुरू आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MP Shashi Tharoor criticized to bjp