पुण्यात 'हाता'ने सोडली 'घड्याळा'ची साथ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीसाठी मुंबईत गेलेल्या पुण्यातील काँग्रेस नेतृत्वाने 162 उमेदवारांची छाननी सुरू केली होती. काँग्रेसने 67 जागांचा दिलेला प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळल्यानंतर आघाडीतील बिघाडी होण्यास सुरवात झाली होती.

पुणे - भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती संपुष्टात आल्यानंतर आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काडीमोड झाला आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणूकीत भाजप-सेना युती पाठोपाठ आता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतही फाटाफुट झाली आहे. दोन्ही काँग्रेसने स्वबळावर ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांना आघाडी होत नसल्याची अधिकृत माहिती दिली. याला राजकीय सूत्रांनी दुजोरा दिला आहे.

आघाडीची शक्‍यता मावळल्याने काँग्रेसने यापूर्वीच स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीसाठी मुंबईत गेलेल्या पुण्यातील काँग्रेस नेतृत्वाने 162 उमेदवारांची छाननी सुरू केली होती. काँग्रेसने 67 जागांचा दिलेला प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळल्यानंतर आघाडीतील बिघाडी होण्यास सुरवात झाली होती. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यात चर्चा होऊन आघाडीबाबत अंतिम निर्णय होईल अशी आशा होती. पण, अखेर आघाडी संपुष्टात आली.

Web Title: Congress, NCP alliance break in Pune