आघाडीत मनसेला घेण्यासाठी हालचाली; राष्ट्रवादी अनुकुल

मंगेश कोळपकर 
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात महाआघाडी करण्याच्या प्रयत्नांना मुंबई, दिल्लीत सध्या वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसेला आघाडीत सहभागी करून घ्यावे, असाही सूर उमटत आहे. त्याबाबत दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली आहे; परंतु याबाबत उघडपणे भाष्य करण्यास तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी टाळले आहे.

पुणे - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही सहभागी करून घेण्यासाठी सध्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत मनसेने चर्चा सुरू आहे, असे स्पष्ट केले आहे, तर समविचारी पक्षांच्या मदतीने आगामी निवडणुकांना सामोरे जायचे असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. दरम्यान, काँग्रेसने तूर्त तरी मनसेच्या सहभागाला विरोध दर्शविला आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात महाआघाडी करण्याच्या प्रयत्नांना मुंबई, दिल्लीत सध्या वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसेला आघाडीत सहभागी करून घ्यावे, असाही सूर उमटत आहे. त्याबाबत दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली आहे; परंतु याबाबत उघडपणे भाष्य करण्यास तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी टाळले आहे.

आपली ताकद असलेले राज्यातील सुमारे ४० विधानसभा मतदारसंघ मनसेने निश्‍चित केले आहेत. त्या मतदारसंघांत त्यांच्या उमेदवारांना यापूर्वी किमान २५ ते ७५ हजार मतदान झाले आहे. संभाव्य आघाडी झाली तर, हे मतदार आघाडीच्या उमेदवारांकडे झुकू शकतात. त्यामुळे तेथील विजयी उमेदवार ठरविण्यात ते मतदार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. म्हणूनच आघाडी झाली तर किमान ३० विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवायची, असे मनसेने म्हटले आहे. भाजप-शिवसेनेची युती झाली किंवा युती झाली नाही तरी, आघाडीच्या मदतीने निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरण्याची तयारी मनसे करीत आहे.

आघाडीत सहभागी झाल्यास मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नवी मुंबई आदी शहरांतील काही जागांवर मनसे दावा करू शकते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा सकारात्मक प्रतिसाद आहे; तर मनसेला बरोबर घेतल्यास मुंबईतील उत्तर भारतीय आणि परप्रांतीय मतदार दुरावतील, या भीतीमुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विरोध करीत आहेत. मात्र, काँग्रेसमधील एक गट संभाव्य आघाडीत मनसेला सहभागी करून घ्यावे, या मताचा आहे.

कोथरूड, हडपसर मिळावेत
आघाडी झाली तर पुण्यातील हडपसर आणि कोथरूड मतदारसंघ मनसेला मिळावेत, अशी मनसेची अपेक्षा आहे. दरम्यान, संभाव्य आघाडीबाबत मनसेच्या वरिष्ठ नेत्यांकडे विचारणा केली असता, ‘सध्या चर्चा सुरू आहे,’ असे सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांकडे विचारणा केली असता, ‘समविचारी पक्षांसोबत आघाडी करत निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे बरोबर यायचे की नाही, हे मनसेने ठरवावे,’ असे सांगण्यात आले; तर, आघाडीत ‘मनसेला घेण्यासाठी राष्ट्रवादी पडद्याआड हालचाली करीत आहे’, असे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले.

Web Title: The Congress-NCP alliance has begun to take part in MNS