... तर आम्हाला आघाडी नको

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

जागा वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद कायम

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस फक्त ४६ जागा देणार असेल तर आम्हाला आघाडी नको, असे काँग्रेसच्या कार्ड कमिटीतील सदस्यांचे म्हणणे आहे. शहरात काँग्रेस गेल्यावेळेस २९ जागांवर निवडून आली आणि ४० जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होती, हे लक्षात घेऊनच आघाडीचे सूत्र निश्‍चित व्हावे, असेही काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

जागा वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद कायम

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस फक्त ४६ जागा देणार असेल तर आम्हाला आघाडी नको, असे काँग्रेसच्या कार्ड कमिटीतील सदस्यांचे म्हणणे आहे. शहरात काँग्रेस गेल्यावेळेस २९ जागांवर निवडून आली आणि ४० जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होती, हे लक्षात घेऊनच आघाडीचे सूत्र निश्‍चित व्हावे, असेही काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची सोमवारी रात्री बैठक घेतली. त्यानंतर पक्षाने काँग्रेसला ५२ जागा देऊ; राष्ट्रवादी ११६ जागांवर निवडणूक लढवेल, असे जाहीर केले. जागा वाटपाचे हे सूत्र काँग्रेसमधील कार्ड कमिटीच्या अनेकांना मंजूर झालेले नाही.

प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुकीसाठी समविचारी पक्षाची आघाडी व्हावी, अशी काँग्रेसची इच्छा आहे. परंतु, राष्ट्रवादी ४६ जागा देणार असतील तर आम्ही आघाडी करणार नाही. राष्ट्रवादीने त्यांचा अधिकृत प्रस्ताव सादर करावा. काँग्रेस हा शहरातील सक्षम पक्ष आहे. त्यामुळे आघाडी सन्मानाने व्हायला हवी.’’ नगर परिषदांच्या निवडणुकीतही राज्यात काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे, हे लक्षात घ्यायला हवे, असे ते म्हणाले.

माजी आमदार मोहन जोशी म्हणाले, ‘‘शहरात काँग्रेस अनेक वर्षे पहिल्या क्रमांकावर होती. अजूनही प्रत्येक प्रभागात पक्षाची ताकद आहे. जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी आघाडी करण्यास आम्ही तयार झालो आहोत. जागा वाटपाचा प्रस्ताव सन्मानकारक असेल तरच काँग्रेसचे कार्यकर्ते तो सहन करतील.’’ शहरात गेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे २९ सदस्य निवडून आले होते. तसेच ४० ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. प्रभागांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन आता जागा वाटपाचे सूत्र निश्‍चित व्हायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सन्मानाने तडजोड करावी
४६ जागांच्या प्रस्तावाला डॉ. कदम, जोशी यांच्यासह उल्हास पवार, आबा बागूल, संजय बालगुडे, संगीता देवकर, अजित आपटे आदींनी विरोध केला आहे. तर, अभय छाजेड, अरविंद शिंदे यांनी सन्मानाने तडजोड करून आघाडी व्हावी, अशी भूमिका मांडली आहे.

संख्याबळानुसार सूत्र; पण चर्चा करू
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा आणि खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘‘दोन्ही पक्षांची सध्याची ताकद लक्षात घेऊन ११६- ४६ हे सूत्र मांडले आहे. प्रत्यक्ष बैठकीत यावर चर्चा होऊन मार्ग निघू शकतो. काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी तयार आहे, त्यामुळे सकारात्मक वातावरणात आघाडी होऊ शकते.’’

Web Title: congress-ncp dispute in municipal election on seat distribution