आघाडीबाबत एकमत, मात्र चर्चा सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

पुणे - पुणे महापालिकेची निवडणूक एकत्र लढविण्यासाठी आणि भाजपला रोखण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात अखेर आघाडीबाबत एकमत झाले आहे. 162 पैकी शंभर जागांबाबत तोडगा निघाल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पिंपरीत दिली. मात्र, काही जागांवर अखेरपर्यंत एकवाक्‍यता न झाल्याने तेथे मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय स्वीकारण्यात आला. पुण्यात प्रथमच कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये निवडणूकपूर्व आघाडी झाली. दरम्यान, आघाडीची अंतिम चर्चा अद्यापही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीबाबत प्रदेश पातळीवरही झालेल्या चर्चेतून मार्ग निघाला नसल्याने दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली होती. त्याच वेळी पवार, शहराध्यक्ष वंदना चव्हाण, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम यांची संयुक्त बैठक पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सुमारे 17 प्रभागांमध्ये दोन्ही कॉंग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. 13 प्रभागांमध्ये आघाडी होणार असून, 11 प्रभागांमध्ये स्वतंत्र लढती होतील. त्यापैकी चार जागा कॉंग्रेस, तर सात जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवतील. 

यादरम्यान कॉंग्रेसच्या काही उमेदवारांना अर्ज भरण्याचे दूरध्वनी गेले होते. त्यामुळे त्यांनी अर्ज भरल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी महापालिकेची निवडणूक एकत्रित लढविण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या मागील काही दिवसांपासून सुरू होत्या. सुरवातीला कॉंग्रेसने 72 जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिला होता. तो फेटाळून अवघ्या 46 जागा देण्याची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहरातील नेत्यांनी दाखविली होती. त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक बैठकीत आघाडीतील आकडे बदलत गेले. पण अखेर 18 प्रभागांवर गेल्या दोन दिवसांपासून एकमत होत नव्हते. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे संकेत दोन्ही कॉंग्रेस नेत्यांनी दिले होते. 

रात्री उशिरापर्यंत मुंबईत चर्चा 
जागावाटपाबद्दल चर्चा झाल्यानंतर या प्रस्तावाला मान्यता घेण्यासाठी डॉ. कदम आणि रमेश बागवे हे हेलिकॉप्टरने मुंबई येथील प्रदेश कार्यालयात गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तेथे रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. 

निवडणूकपूर्व आघाडी प्रथमच 
राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना 1999 मध्ये झाली. तेव्हापासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वबळावर निवडणुका लढविल्या आहेत. मात्र, सत्तास्थापनेसाठी निवडणुकीनंतर दोन्ही कॉंग्रेस एकत्र आल्याचा पुण्याचा राजकीय इतिहास आहे. त्यामुळे या वर्षी प्रथमच या दोन्ही कॉंग्रेसने निवडणूकपूर्व आघाडी केली आहे. 

Web Title: congress - ncp pmc