मी मताधिक्‍य दिले, आता मदत करा : हर्षवर्धन पाटील

सचिन लोंढे
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

विधानसभा निवडणूक लढविणार आहे. लोकसभा निवडणुकीत कोणाचाही एक नया पैसाही न घेता मित्रपक्षाचे प्रामाणिकपणे काम करत 71 हजारांचे मताधिक्‍य दिले. आत्ता विधानसभेला त्यांनीही मला मदत करावी, अशी अपेक्षा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे व्यक्त केली आहे.

कळस : विधानसभा निवडणूक लढविणार आहे. लोकसभा निवडणुकीत कोणाचाही एक नया पैसाही न घेता मित्रपक्षाचे प्रामाणिकपणे काम करत 71 हजारांचे मताधिक्‍य दिले. आत्ता विधानसभेला त्यांनीही मला मदत करावी, अशी अपेक्षा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे व्यक्त केली आहे.

कळस (ता. इंदापूर) येथे गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील होते. ज्या गावातून 2000 एकर ऊस कारखान्याकडे येत होता, तेथून आता 100 एकर ऊस येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्‍यात 65 टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जनावरांच्या 11 छावण्या सुरू आहेत. धरणे तुडुंब भरली आहेत. पण तालुक्‍यातील कालव्याला व तलावात पाणी सोडले नाही. गेल्या पाच वर्षांत खडकवासला कालव्याचे 22 हजार हेक्‍टर क्षेत्राचे पाणी मिळाले नाही. सणसर कटला एक थेंबही पाणी देण्यात आले नाही. तालुक्‍यातील पाणी प्रश्नावर मोठे जनआंदोलन उभे करण्याची गरज आहे, असे पाटील यांनी सांगितले.

खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी दौंड, हवेली व पुण्याशी संघर्ष करावा लागेल. नीरा डावा कालव्याच्या पाण्यासाठी बारामतीशी तर उजनी धरणातील पाण्यासाठी मराठवाडा, सोलापूरशी संघर्ष करण्याशिवाय पर्याय उरला नाही. या सर्वांसोबत संघर्ष करण्यासाठी जनआंदोलन, न्यायालयीन लढाई व प्राधिकरण यांच्याकडे पाठपुरावा करावा लागेल. याचबरोबर तालुक्‍यातील तरुणांचे रोजगाराचा व महाविद्यालयीन शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. येत्या 8 ते 10 दिवसांत कर्मयोगीची एफआरपीपोटी ज्या शेतकऱ्याची रक्कम थकली आहे, ती जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

इंदापूर तालुक्‍यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. धरणे भरली तरी खडकवासला कालव्याला व त्याच्या जीवावरील तलावात पाणी सोडण्यात आले नाही. गेल्या पाच वर्षांत तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे ढोबळपणाने हिशोब केल्यास 4 हजार कोटींचे प्रती वार्षिक नुकसान झाले आहे.
हर्षवर्धन पाटील, माजी सहकारमंत्री

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress-NCP Politics In Indapur