पुण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचा मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि आमदार विद्या चव्हाण घेणार असून या मुलाखती पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालयात होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारठकर यांनी सांगितले.

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पुणे जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केला आहे. यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखती येत्या शनिवारी (ता. २७) आणि काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती येत्या मंगळवारी (ता. ३०) घेण्यात येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि आमदार विद्या चव्हाण घेणार असून या मुलाखती पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालयात होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारठकर यांनी सांगितले.

काँग्रेसने इच्छुकांच्या मुलाखतीसाठी दोन निरीक्षक नियुक्त केले आहेत. या मुलाखती पुण्यातील काँग्रेस भवनात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात होणार असल्याचे या पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती आणि आंबेगाव या दोन विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी विद्यमान आमदारांशिवाय अन्य एकही जण इच्छुक नाही. त्यामुळे या दोन मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी मुलाखती होणार नाहीत. पक्षाने केवळ आठ मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress NCP takes interview for assembly election in Maharashtra