काँग्रेसला संधी हवी - उल्हास बापट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

काँग्रेसला सरकार स्थापण्यासाठी संधी न देणे, हा अन्याय वाटतो. इतर तीन पक्षांना सत्तास्थापनेची संधी दिली असेल, तर काँग्रेसलाही दिली पाहिजे होती, असे मत राज्यघटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी मंगळवारी व्यक्त केले.

पुणे -  काँग्रेसला सरकार स्थापण्यासाठी संधी न देणे, हा अन्याय वाटतो. इतर तीन पक्षांना सत्तास्थापनेची संधी दिली असेल, तर काँग्रेसलाही दिली पाहिजे होती, असे मत राज्यघटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी मंगळवारी व्यक्त केले.

राज्यात निर्माण झालेल्या घटनात्मक पेचप्रसंगाबाबत प्रा. बापट म्हणाले, ‘‘सत्तास्थापनेसाठी कोणाला किती वेळ द्यायचा, याचा उल्लेख राज्यघटनेत नाही. ‘राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांची निवड करतात,’ असे एकच वाक्‍य आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपला दोन दिवस दिले असतील, तर इतर पक्षांनाही तितकाच वेळ द्यायला हवा, असे मला सकृतदर्शनी वाटते. राज्यपालांनी घाई का केली, याचे कारण सर्वोच्च न्यायालयात त्यांना द्यावे लागेल. राष्ट्रपती राजवट ही घटनाबाह्य, असे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिले आहेत.’’ राजकारणाच्या या खेळात प्रत्यक्षात खूप वेळा ‘पार्सलेटी’ केली जाते, असेही लक्षात आलेय. विशेषतः राज्यपालांची भूमिका आहे, ती संशयास्पद राहिली आहे. कारण, त्यांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते आणि त्यांना पदावरून काढण्याचे अधिकारही त्यांना असतात. हे सगळे पंतप्रधानांच्या सल्ल्याने केले जाते. त्यामुळे काही वेळा राज्यपाल हे केंद्राच्या दबावाखाली निर्णय घेतात,’’ असे प्रा. बापट यांनी स्पष्ट केले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राष्ट्रपती राजवटीत राज्याचे नुकसान 
राष्ट्रपती राजवट सुरू केल्यानंतर कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींकडे आणि कायदे मंडळाची सत्ता संसदेकडे जाते. पण, न्यायमंडळावर काहीही परिणाम होत नाही. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर कोणताही परिणाम होत नाही. पण, राज्यापुढील प्रश्‍न सोडविण्यासाठी, धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी जनतेने निवडून दिलेला विधानसभेचा नेता हवा असतो. त्या अर्थाने राष्ट्रपती राजवटीत राज्याचे नुकसान होते, असे प्रा. बापट यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress needs opportunity says Ulhas Bapat