कॉंग्रेसच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

पिंपरी - महापालिकेच्या फेब्रुवारीत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी शहर कॉंग्रेसने आयोजित केलेल्या मुलाखतींना इच्छुकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभरात सुमारे अडीचशेहून अधिक इच्छुकांनी मुलाखती देऊन निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. 

पिंपरी - महापालिकेच्या फेब्रुवारीत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी शहर कॉंग्रेसने आयोजित केलेल्या मुलाखतींना इच्छुकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभरात सुमारे अडीचशेहून अधिक इच्छुकांनी मुलाखती देऊन निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. 

सोमवारी सकाळी दहा वाजता पिंपरीतील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात मुलाखतींना प्रारंभ झाला. शहराच्या 32 प्रभागांसाठी मुलाखती झाल्या. त्यामध्ये तरुणांची व महिलांची संख्या मोठी होती. नुकताच कॉंग्रेसच्या सात नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिला. या घटनेचा मुलाखतींवर परिणाम होईल, असे वाटत होते. प्रत्यक्षात सर्वच प्रभागांतून मुलाखतींना चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यमान नगरसेवकांपैकी कैलास कदम, सद्‌गुरू कदम, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, संग्राम थोपटे, मयूर जयस्वाल, चिंतामणी सोंडकर आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी दुपारपर्यंत मुलाखती दिल्या. मात्र, मान्यवरांपेक्षा सामान्य चेहरे मुलाखतीसाठी अधिक दिसले. हे इच्छुक निवडून येण्याचे निकष पूर्ण करू शकतात की नाही याबद्दल शंका आहे. 

समर्थकांमुळे वाहतूक कोंडी 
"कॉंग्रेसचा विजय असो', "येऊन-येऊन येणार कोण, पंजा शिवाय आहेच कोण?' अशी घोषणाबाजी करत अनेक इच्छुकांनी समर्थकांसह रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. समर्थकांमुळे लोखंडे सभागृहाच्या लॉबीमध्ये महिला व पुरुष कार्यकर्त्यांच्या तुडुंब गर्दीने चेंगराचेंगरी झाली. सभागृह इमारतीबाहेर नेहरूनगर रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली. याच इमारतीत वाहतूक शाखेचे कार्यालय आहे; परंतु पोलिसांची कमी संख्या असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर पाहावयास मिळाली. प्रवेशद्वारावर कॉंग्रेसचे फलक लावले होते. इच्छुक व त्यांच्या समर्थकांच्या वाहनांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील मैदानावर पार्किंगची व्यवस्था केली होती, तरीही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. 

- कॉंग्रेस पक्षाचा ध्वज घेऊन कार्यकर्त्यांची गर्दी, घोषणाबाजीमुळे परिसर दणाणला 
- एकेक नाव ध्वनिक्षेपकावर पुकारल्यानंतर फक्त इच्छुक उमेदवारालाच प्रवेश 
- प्रत्येक प्रभागातील एकावेळी एकच उमेदवाराला बोलावणे 
- दुपारी तीनपर्यंत फक्त 50 मुलाखती पूर्ण 
- दुपारनंतर एकावेळी दोन उमेदवारांच्या मुलाखती 
- संध्याकाळी उशिरापर्यंत मुलाखती सुरू 

मुलाखतीचे पॅनेल 
हर्षवर्धन पाटील, सचिन साठे, कविचंद भाट, संग्राम थोपटे, अशोक मोरे, निगार भारस्कर, श्‍यामला सोनवणे, गौतम आरकडे, नरेंद्र बनसोडे, शहाबुद्दीन शेख, राजेंद्रसिंह वालिया, विष्णू नेवाळे, लक्ष्मण रूपनर यांनी मुलाखती घेतल्या. इच्छुकांच्या प्रतिसादामुळे पक्ष संघटनेत बऱ्याच कालावधीनंतर उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले, तर पक्षाला मानणारा मोठा वर्ग आजही कायम असल्याचे स्पष्ट झाले. 

Web Title: Congress responded to the spontaneous interviews