Pune Lok Sabha Election : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार - बाळासाहेब थोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress will contest Pune Lok Sabha by-election Balasaheb Thorat politics

Pune Lok Sabha Election : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार - बाळासाहेब थोरात

पिंपरी : आमची महाविकास आघाडी आहे. यात ताकद जास्त कोणाची यापेक्षा पारंपरिक पद्धतीने कोण निवडणूक लढत आलोय. चर्चा होत असते आम्हीही बैठकीत चर्चा करुन निर्णय घेऊ. आता कसबा विधानसभा आम्ही लढलो सर्वांचं सहकार्य झालंच, हे आम्ही नाकारत नाही.

तसंच ही लोकसभा आम्ही लढवू आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे, अशीच विनंती आमची राहील. आमची एक पध्दत आहे, ज्यांचा मतदारसंघ त्यांनी निवडणूक लढवावी, असे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी (ता. ८) पत्रकारांंशी बोलताना व्यक्त केले.

थोरात म्हणाले की, लोकसभा अत्यंत महत्वाच्या निवडणुका पुढच्या काळात राहणार आहेत. त्यांनंतर विधानसभा. कदाचित त्यापुर्वी महापालिका निवडणुका लागतील. मात्र लोकसभाच महत्वाची आहे ही वस्तुस्थिती आहे.

अजित पवार म्हणतात पुणे लोकसभा राष्ट्रवादीचं लढवेल याबाबत विचारले असता थोरात म्हणाले की, ही चर्चा होते, अगदी बैठकीत ही हा मुद्दा होईल. मात्र पारंपरिक पद्धतीने जो लढत आलाय, त्यानेच तो लढवावा आणि त्यावर आम्ही ठाम राहू.

मावळ लोकसभा काँग्रेस लढणार का याबाबत विचारले असता ते म्हणाले की, तसं काही नाही, आम्ही ४८ लोकसभेबाबत चर्चा करतोय. त्यात काही कार्यकर्ते म्हणतात ही जागा काँग्रेसला घ्या, तो कार्यकर्ता मीडियाला येऊन सांगतो आणि तशा बातम्या चालतात. मात्र तूर्तास त्या चर्चांमध्ये तथ्य नाही. लवकरच एकत्र बसून जागा वाटप होईल. राहुल गांधींबद्दल तीन नेत्यांनी पत्र दिले त्याबाबत विचारले असता, अशा काहीही चर्चा होतात त्यात तथ्य नाही, असे त्यांनी सांगितले.

कोण काय बोलतेय.. याबाबत चॅनेलनी आचारसंहिता घालून घ्यावी नितेश राणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले की, राजकारणाचा स्तर इतका खालावला आहे की आम्ही टीव्ही पाहणं बंद करतोय. कोणीतरी काही बोलावं आणि ते संपूर्ण जनतेने पाहावं.

आता हे जर आचारसंहिता पाळत नसतील तर; किमान चॅनेल ने तरी आपली एक आचारसंहिता बनवावी. अशी उलट माझी मागणी आहे. तुम्हीच अशा बातम्या दाखवू नयेत. कोणी कोणाबद्दल काय बोलावं याचं काही तारतम्य बाळगायला हवं. संसदेतील माझ्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीतील अशी खालची पातळी मी कधी पाहीली नव्हती. कोणते वय कोण माणूस कशा पध्दतीने बोलले पाहिजे. एकमेकांचा आदर ठेवला पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती ती जपली पाहिजे.