कॉन्स्टेबल पद्मासाठी यंदाची भाऊबीज स्पेशल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

पाळण्यात दिसले पद्माचे पाय
अनिल म्हणाला, ""पद्मा ही समाजातील कदाचित पहिली महिला पोलिस असावी. ती लहान असताना एक पोलिसकाका आमच्या घरी यायचे. एक दिवस पद्माने पोलिस होण्यासाठी काय काय करावं लागतं, याची सगळी माहिती त्यांच्याकडून मिळविली. तेव्हापासून तिनं पोलिस व्हायचा निर्धार केला अन्‌ तो पूर्णही केला.''

पुणे - ""एक वर्षाची असताना आणि माझी धाकटी बहीण आईच्या पोटात असताना वडील वारले. मोठा भाऊ तेव्हा दहा वर्षांचा होता. तोच आमचा पिता बनला. शिकून मोठं व्हायचं, स्वतःचं स्वप्नं त्यानं माझ्यात पाहिलं. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मी ते पूर्ण केलं. मी पोलिस बनले. मला इथपर्यंत आणण्याचं कर्तव्य पार पाडून भावानं मला याआधीच ओवाळणी घातलीय. आता स्वप्नपूर्तीच्या तेजाने मी त्याचं औक्षण करणार आहे. म्हणूनच यंदाची भाऊबीज माझ्यासाठी स्पेशल आहे.''

येरवडा कारागृहात कॉन्स्टेबलपदी रुजू झालेली पद्मा अनमोल कराळेकर सांगत होती. श्रमसाफल्याचा आनंद तिच्या शब्दाशब्दांतून उमटत होता. येरवड्यातील एका वस्तीमध्ये दहा बाय दहाच्या खोलीत कराळेकर कुटुंब राहतं. वडिलांच्या निधनानंतर आई, तीन बहिणी, एक भाऊ अशी जबाबदारी मोठा भाऊ अनिल याच्यावर पडली. बारावीपर्यंत शिकून त्यानं नोकरी पत्करली. मोठ्या बहिणीचं शिक्षण झालं नव्हतं; पण दुसऱ्या दोन बहिणींना शिकवायचा चंग त्यानं बांधला.

कटू भूतकाळ आठवत असतानाच वर्तमानातल्या आनंदानं मोहरून पद्मा बोलत होती. ""भावानं स्वतः शिक्षण सोडलं; पण बहिणींना शिकायला लावलं. त्यांच्या इच्छापूर्तीसाठी आणि आमच्या भवितव्यासाठी आम्हीही कष्ट घेतले. पदवीनंतर मी भरतीसाठी सराव सुरू केला. काही लोकांचा त्याला विरोध होता. हिचा सराव आणि अभ्यास म्हणजे केवळ टाइमपास, अशी अवहेलना होत होती; पण मी निश्‍चयी होते.''

पद्मा पुन्हा भूतकाळात गेली. ""जेलरच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले; मात्र निवड झाली नाही. ती दिवाळी त्रासाची गेली; पण यंदा मात्र दिवस बदललेत. कॉन्स्टेबलची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नियुक्तीपत्र मिळून मी रुजू झालेय. गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या कंजारभाट समाजात मी जन्मले. गुन्हेगारी वातावरण असलेल्या वस्तीत वाढले. शेरेबाजी करणाऱ्या समाजाचा विरोध पचवत शिकले. कैद्यांना शिस्त लावण्याचं काम मी आता करणार आहे. समाजावरचा गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी मी पोलिस झालेय.''

Web Title: Constable Padma celebrates Diwali