Coronavirus:बांधकाम मजुरांना जेवण;कामगार कल्याण मंडळाकडून सोय

construction
construction

पुणे - शहरातील बांधकाम प्रकल्पांवरील सुमारे 10 ते 12 हजार मजूर आणि त्यांच्या कुटुंबांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीतून जेवण दिले जात आहे. मंडळाकडे जमा झालेल्या "लेबर सेस'मधून हा खर्च करण्यात येत आहे. यापूर्वी हे जेवण सशुल्क देण्यात येत होते. आता ते मोफत दिले जात आहे. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत अनेक गृहप्रकल्पांचे कामे सुरू असून त्यावर हजारो मजूर काम करीत आहेत. त्यापैकी बहुतांश मजूर परराज्यातील आहेत. कोरोना पार्श्‍वभूमीवर देशभरात लॉकडाउन सुरू असल्याने हजारो मजूर बांधकाम प्रकल्पांवर अडकून पडले आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

मंडळाने त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून गृहप्रकल्पांवर अडकून पडलेल्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांची माहिती मागविली होती. ती मिळाल्यानंतर मंडळाकडून पाच, तर बांधकाम कामगार अथवा बांधकाम व्यावसायिकांकडून पाच रुपये, अशा एकूण दहा रुपयांत त्यांना प्रकल्पाच्या ठिकाणी जेवण देण्याची सोय केली होती. मात्र, लॉकडाउनमुळे मजूर अथवा बांधकाम व्यावसायिकांकडून त्यांच्या हिश्‍श्‍याची रक्कम देण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे जेवणासाठी सर्व खर्च मंडळाने करावा, असा निर्णय घेतला आहे. याबाबत मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चु. श्रीरंगम्‌ यांनी आदेश दिला आहे. 

बांधकाम प्रकल्पाचे आराखडे मंजूर करताना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या एक टक्का रक्कम "लेबर सेस' म्हणून बांधकाम व्यावसायिकांकडून घेतली जाते. ही रक्कम मंडळाकडे जमा केली जाते. आतापर्यंत सेसच्या माध्यमातून मंडळाकडे 15 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. त्या निधीतून हा खर्च करण्यात येत आहे. 

लॉकडाउनमुळे बांधकाम प्रकल्पांवर अडकून पडलेल्या बांधकाम मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भोजनाची व्यवस्था करावी, अशी मागणी "क्रेडाई'चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांनी मंडळाकडे केली होती. त्याची दखल घेऊन मंडळाने ही व्यवस्था केली आहे. 
-जयप्रकाश श्रॉफ, अध्यक्ष, लेबर कमिटी, क्रेडाई 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com