
आगीमुळे नुकसान झालेल्या कांदा चाळीचे शेतकऱ्याला एक लाख रुपये नुकसान भरपाई महावितरण कंपनीने द्यावी : स्थायी लोक अदालत पुणे न्यायालयाचे आदेश.
मंचर : महावितरण कंपनीच्या चुकीमुळे स्पार्किंग होऊन रांजणी (ता.आंबेगाव) येथील शेतकरी चांगदेव अनंता भोर यांच्या शेतात असलेल्या कांदा चाळीतील कांदा चार वर्षापूर्वी जळून गेला होता. भोर यांना झालेल्या नुकसान भरपाई पोटी एक लाख रुपये रक्कम नुकसान भरपाई व अर्ज दाखल तारखेपासून परतफेड होईपर्यंत सदर रक्कमेवर सहा टक्के दराने व्याज द्यावे. असा आदेश स्थायी लोक आदालत पुणे न्यायालयाने महावितरण कंपनीला दिला आहे.
हे वाचा - 'तुम्हाला जिवंत सोडत नाही'; जमीन वाटपाच्या रागातून इंदापुरात महिलेचा खून!
दरम्यान, (ता. २७ सप्टेंबर २०१६ रोजी) पहाटे साडेचार वाजता रांजणी येथील पळस मळा येथे कांदा चाळीवरून जाणाऱ्या विद्युत वाहिनीचा फेज व न्यूट्रल एकमेकाच्या संपर्कात आल्यामुळे स्पार्किंग होऊन कांदा चाळीला आग लागली होती. त्यामुळे चांगदेव भोर यांचे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले होते.
नुकसान भरपाई मिळावी म्हणून ग्राहक पंचायतीचे अशोक भोर यांच्या सहकार्याने महावितरण कंपनीकडे नुकसान भरपाईचा अर्ज केला.पण महावितरण कंपनीने नुकसान भरपाई देण्याची टाळाटाळ केली. पुणे येथील स्थायी लोक अदालत न्यायालयात ४ जुलै २०१८ रोजी नुकसान भरपाईसाठी अर्ज दाखल केला.
“कांदा चाळिस लागलेली आग याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण कंपनीची आहे. असा प्राप्त झालेला राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षकांचा अहवाल सोबत जोडला होता” या अहवालाचा विचार करून पुणे येथील स्थायी लोक आदालत न्यायालयाचे अध्यक्ष जे. टी. उत्पात, सदस्य आर. पी बिडकर, सदस्य ए. सी. रौंदाळे यांनी अर्जदार चांगदेव भोर यांना नुकसान भरपाई एक लाख रुपये द्यावी व त्यांना रकमेवर अर्ज दाखला झालेल्या तारखेपासून त्याची परत फेड होईपर्यंत सहा टक्के दराने व्याज द्यावे.असा आदेश दिला आहे. आदेशाच्या प्रती महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मंचर, मुख्य कार्यकारी अभियंता रास्ता पेठ पुणे, सुप्रीटेडेट ऑफ इंजीनियरिंग पुणे ग्रामीण यांना देण्यात आले आहेत.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कांदा चाळीचे नुकसान झाल्यामुळे हतबल झालो होतो. महावितरण कंपनीकडे सुरुवातीला नुकसान भरपाईसाठी अर्ज विनंत्या केल्या. पण त्यांनी दाद दिली नाही. ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर यांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे स्थाई लोक अदालत न्यायालयात माझी बाजू मांडली. सुनावणी होऊन न्यायालयाने माझा अर्ज मंजूर केला. त्यानंतर नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांनीही स्पार्किंगमुळे नुकसान झाल्यास स्थायी लोकअदालतमध्ये दाद मागता येते. मला नुकसान भरपाई मिळाल्यामुळे चार वर्षाच्या लढ्याला यश आले आहे. -चांगदेव भोर कांदा उत्पादक शेतकरी,रांजणी (ता.आंबेगाव)
(संपादन : सागर डी. शेलार)