बापरे! निर्यात होणाऱ्या कंटेनरच्या भाड्यात पाच पटीने वाढ

Container-Export
Container-Export

मार्केट यार्ड - देशातून एका बाजूला शेतमालाची निर्यात वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला कंटेनरचे भाडे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे निर्यात खर्चात वाढ झाली आहे. देशातून तांदूळ, आटा, धने, जिरे, खसखस आदी मसाल्याचे पदार्थ अशा अनेक वस्तू निर्यात होत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर निर्यात कमी होण्याची शक्यता असल्याचे मत मार्केट यार्डातील निर्यातदार व्यापारी धवल शहा यांनी व्यक्त केले. मागील वर्षी मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूला सुरुवात झाली होती आणि लगेच लॉकडाउनही सुरू झाला. त्यामुळे अनेक स्थानिक व्यवसाय बंद झाले. परदेशातून भारतातील वस्तूंना जी मागणी होती ती काही प्रमाणात चांगली होती. निर्यातही चांगली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतातून परदेशात जो माल निर्यात होतो त्यातला बराच माल समुद्र मार्गे जातो. त्याच वाहतूक दरात मोठ्याप्रमाणात वाढ झाली. मार्च २०२० मध्ये आपल्या देशातून अमेरिका किंवा इतर देशांत ज्या दरामध्ये कंटेनर पाठवला जात होता त्या कंटेनरच्या भाड्यात चार ते पाचपटीने वाढ झाली  आहे.

यामुळे होते नुकसान

  • मार्च २०२० मध्ये ८० रुपये प्रति किलो ने विकलेला माल परदेशात मूळ भाव ८० + ५ रुपये वाहतूक भाडे म्हणजे ८५ रुपयांना पोचत होते
  • मार्च २०२१ मध्ये मूळ भाव ८० + २० रुपये वाहतूक खर्च म्हणजे १०० रुपये प्रति किलो झाला आहे
  • त्यामुळे परदेशातून मालाची ऑर्डर मिळत नाही
  • त्याच बरोबर भावात खूप मोठी तफावत झाली आहे
  • जे सौदे एडव्हान्समध्ये झालेले आहेत त्यामध्ये स्थानिक व्यापाऱ्याचे खूप मोठे नुकसान होते
  • साधारण प्रति किलो मागे २० रुपये नुकसान व्यापाऱ्यांना सोसावे लागते 
  • एका कंटेनरमध्ये साधारण २० टन माल जातो
  • त्यामुळे एका कंटेनर मागे साधारण चार लाख रुपयांपर्यंत नुकसान होते

यंदा निर्यात वाढली आहे. आपल्या देशातून कंटेनरमध्ये समुद्रमार्गे चीन, न्यूयॉर्क, युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर कंटेनर गेले आहेत. ते खाली होत नाहीत. त्या त्या देशातून कंटेनर परत येत नाही. कंटेनरची खूप मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे.
- धवल शाह, निर्यातदार, मार्केट यार्ड

असे आहे गणित
मार्च २०२० मध्ये भारतातून अमेरिकेला एका कंटनरचे भाडे साधारण १३०० ते १४०० डॉलर होते. म्हणजे साधारणत: ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल मालाचे वाहतूक भाडे होते. त्याचबरोबर कंटेनरची उपलब्धता ही मोठ्या प्रमाणावर होती. कंटेनर बुक केले की त्वरित मिळत होते. पण सद्य:स्थितीत कंटेनरची उपलब्धता नाही. कंटेनर लवकर मिळत नाही. त्यामुळे कंटेनरचे भाडे १३०० ते १४०० वरून ५००० ते ५५०० अमेरिकन डॉलरवर गेले आहे. गेल्या वर्षात वाहतूक भाडे चार ते पाच पटीने वाढले आहे. कंटेनर भाडे पाच हजार डॉलर म्हणजे मालावर दोन हजार रुपये प्रतिक्विंटल वाहतूक भाडे झाले आहे. वाहतुकीमुळे मालाची किंमत २० रुपये प्रतिकिलो वाढली आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com