कंटेनरच्या अपघातामुळे  चिंचवडला वाहतूक कोंडी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

निगडीहून दापोडीच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर रस्ता दुभाजकावर गेल्याने अपघात झाला. कंटेनरची केबिन विरुद्ध दिशेने फिरून पूर्ण कंटेनर रस्त्यावर आडवा झाला. त्यामुळे ग्रेडसेपरेटरमधील एक लेन वाहतुकीसाठी सुरू राहिल्याने वाहतूक मंदावली.

पिंपरी : निगडी ते दापोडी ग्रेडसेपरेटरमध्ये चिंचवड येथील संत मदर तेरेसा उड्डाणपुलाखाली शुक्रवारी (ता. 9) पहाटे साडेतीनच्या सुमारास झालेल्या अपघातात कंटेनर रस्त्यावर आडवा आल्याने वाहतूक कोंडी झाली. 

येथे मेट्रोचे काम सुरू असल्याने ग्रेडसेपरेटरमधील रस्ता तसेच सेवा रस्ता अरुंद झाला आहे. त्यात निगडीहून दापोडीच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर रस्ता दुभाजकावर गेल्याने अपघात झाला. कंटेनरची केबिन विरुद्ध दिशेने फिरून पूर्ण कंटेनर रस्त्यावर आडवा झाला. त्यामुळे ग्रेडसेपरेटरमधील एक लेन वाहतुकीसाठी सुरू राहिल्याने वाहतूक मंदावली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दोन क्रेनच्या साहाय्याने सुमारे दीड तासाने कंटेनर हटविला. त्याकाळात आकुर्डी-काळभोरनगर तसेच चिंचवडस्टेशन येथील ग्रेडसेपरेटरचे "मर्ज इन' बंद करून सर्व वाहतूक सेवा रस्त्यावर वळविली. त्यामुळे कोंडी झाली. 

चाकरमान्यांचे हाल 
सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्यांना कोंडीचा सामना करावा लागला. यामुळे अनेकांना उशीर झाला. तसेच शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचेही हाल झाले. ग्रेडसेपरेटर बंद केल्याने सेवा रस्त्यावरील वाहतुकीवर ताण आला. 

घटनाक्रम 
पहाटे 3.30 : कंटेनरचा अपघात 
सकाळी 7 : पोलिस घटनास्थळी दाखल 
स.9.30 : ग्रेडसेपरेटरमधील एक लेन वाहतुकीसाठी सुरू 
स. 9.40 : कंटेनर हटविण्यासाठी दोन क्रेन दाखल 
स. 10 : काळभोरनगरपासून ग्रेडसेपरेटर वाहतुकीसाठी बंद 
स. 11.30 : क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर हटविला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: contenar accident in chinchwad traffic jam