सलग वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

पिंपरी - शहरातील पिंपळे सौदागर, विशालनगर, पिंपळे निलख, वाकड, थेरगाव या परिसरात महिन्यातून ५० ते ७५ तास वीज नसते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पलाश हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष किरण वडगम यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. 

पिंपरी - शहरातील पिंपळे सौदागर, विशालनगर, पिंपळे निलख, वाकड, थेरगाव या परिसरात महिन्यातून ५० ते ७५ तास वीज नसते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी पलाश हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष किरण वडगम यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. 

सतत भेडसावणाऱ्या विजेच्या प्रश्‍नाबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा दाद मागितली. प्रत्येक वेळी यावर काम सुरू असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रश्‍न गंभीर बनला आहे. या परिसरातील नागरिकांची संख्या अडीच ते तीन लाखांपर्यंत आहे. शहराच्या लोकसंख्येत सातत्याने भर पडत असून, हा आकडा २१ लाखांपर्यंत जाऊन पोचला आहे. एकीकडे शहराचा झपाट्याने विकास होत आहे. त्याचबरोबर लोकसंख्याही वाढत आहे. तर  दुसरीकडे मात्र, महावितरणचा वीजपुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे नागरिकांचा त्रास वाढला आहे.

वीज पुरवठ्यासाठीच्या पायाभूत सुविधा कुचकामी झाल्या असल्यामुळे हे प्रकार सातत्याने घडत असल्याचे पत्रात म्हटले आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये करण्यात आल्याने या भागातील विजेचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही किरण वडगम यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

उद्योजक म्हणतात....
खंडित वीजपुरवठ्यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे. अनेक दिवसांपासून हा त्रास सुरू आहे. महावितरणने त्यात तत्काळ सुधारणा न केल्यास उद्योग बंद ठेवून आंदोलन करावे लागेल. 
- प्रमोद राणे, रागा कॉर्पोरेशन

पावसाळा सुरू झाल्यापासून वीज जाण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. वीजवाहिन्या ठिकठिकाणी तुटल्या आहेत. यामध्ये तत्काळ सुधारणा होण्याची आवश्‍यकता आहे. 
- जयंत कड, विजया इंजिनिअरिंग

विनाखंडित वीजपुरवठ्यासाठी बिलात पैसे आकारले जातात. मात्र, सतत वीजपुरवठा खंडित होत असतानाही आम्ही हे पैसे देत आहोत. महावितरण विभागातील फोन उचलले जात नाहीत. तसेच, तक्रार ऑनलाइन नोंदविण्याबाबत सांगितले जाते. महावितरणने जबाबदारी स्वीकारून हा प्रश्‍न सोडवावा. 
- दीपक फल्ले, दिनेश प्रेसिंग

Web Title: Continue electricity supply chief minister