केंद्र व राज्यात संकुचित भांडवलशाही सुरू - पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे - लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या वैधानिक संस्थांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांना घुसविणे, संस्थांचे अवमूल्यन करून निष्प्रभ करणे, देशाचे संविधान धर्म असल्याचे सांगून पद्धतशीर संविधान बाजूला सारून कारभार सुरू आहे. सध्या केंद्र व राज्य सरकार केवळ मूठभर उद्योजकांच्या हिताचे निर्णय घेत संकुचित भांडवलशाही राज्यप्रणाली राबवीत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केला. 

टिळक स्मारक मंदिर येथे राजीव गांधी स्मारक समिती आणि पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित राजीव गांधी सप्ताह कार्यक्रमात "देशापुढील आर्थिक आव्हाने' या विषयावर ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राज्यसभेचे खासदार कुमार केतकर, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, गोपाळी तिवारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

चव्हाण म्हणाले,""पंचवार्षिक योजना, नियोजन आयोग बरखास्त करून देशात अमेरिकाधार्जिणे धोरणे राबविली जात आहेत. अर्थव्यवस्था मोजण्याची व्याख्याच बदलल्यामुळे नेमका विकासदर मोजता येत नाही. राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेद्वारे प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशाचा दरडोई विकासदर 6.5 इतका घसरला आहे. त्याला कारण अविचारी नोटबंदी आणि जीएसटी लागू करण्याची घाई. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये एकही बहुराष्ट्रीय कंपनी राज्यात आली नाही. व्यापारसुलभतेमध्ये राज्याचा 13 वा क्रमांक आणि विकासदरामध्ये पाचवा क्रमांक लागतो. लादली जात असलेली बुलेट ट्रेन, सिडको जमीन घोटाळा, समृद्धी महामार्ग घोटाळा अशा घोटाळ्यांमध्ये राज्य सरकार चर्चेत राहिले आहे.'' 

"राजीव गांधी नंतरचा भारत' विषयावर केतकर म्हणाले, ""धर्मावर आधारित राष्ट्र कधीच टिकत नाही. शस्त्र आणि धर्मसामर्थ्य वाढवून देशात हिंदू धर्माची सत्ता आणण्याची रणनीती आखली जात आहे. जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणामुळे संगणकक्रांती झाली, त्याची बीजे राजीव गांधी यांच्या दूरदृष्टी नियोजनात आहे. मोदींनी केवळ खोटी आश्‍वासने दिली, परदेश दौऱ्यांच्या खर्चा इतकीदेखील गुंतवणूक देशात आली नाही.'' 

केंद्र व राज्य सरकारने देशात एकही कारखाना आणला नसला, तरी घोषणांचा कारखाना मात्र जोरात सुरू आहे. भपकेबाज जाहिराती, खोटी आकडेवारी देऊन तरुणाईला भुलविण्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार केले जात आहे. संविधान वाचविण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या वेळी केले.

Web Title: Continuous capitalism in the center and the state says Prithviraj Chavan