ठेकेदाराला भरपाई पालिकेनेच द्यावी - नितीन गडकरी

Nitin gadkari
Nitin gadkari

पुणे - ‘चांदणी चौकातील नियोजित उड्डाण पुलाच्या कामासाठी झाडे आणि सेवावाहिन्यांचे वेळेत स्थलांतर केले नाही आणि त्यामुळे ठेकेदाराने जर भरपाई मागितली, तर ती भरपाई महापालिकेला द्यावी लागेल,’’ अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी महापालिका अधिकाऱ्यांना खडसावले. तातडीने ही कामे मार्गी लावा, अशा सक्त सूचनाही त्यांनी दिल्या.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दुमजली उड्डाण पूल उभारण्यात येत आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे २७ ऑगस्ट २०१७ मध्ये भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर दीड वर्षात भूसंपादन न झाल्याने काम रखडले होते. त्यानंतर गडकरी पुण्यात दोन ते तीन वेळा यापूर्वी कार्यक्रमाला आले, तेव्हा त्यांनी या कामाला होत असलेल्या विलंबाबाबत जाहीर नाराजी व्यक्‍त केली होती, तरी महापालिकेकडून या कामात प्रगती होऊ शकली नव्हती.

पुलासाठी ३१ हेक्‍टर जागेची गरज असून, त्यातील सुमारे ९५ टक्के जागा संपादित झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने मध्यंतरी केला, त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ४ मे २०१९ मध्ये या कामाचे आदेश ठेकेदाराला दिले होते. प्रत्यक्षात कामाला सुरवात झाल्यानंतर अकरा टक्केच जागेचे भूसंपादन झाल्याचे समोर आले, तर ३४ टक्के काम हे झाडांमुळे, १३ टक्के काम हे सांडपाणी व विद्युत वाहिन्यांमुळे, तर २५ टक्के काम हे जलवाहिन्यांच्या स्थलांतरामुळे राहिल्याचे समोर आले आहे. 

विविध कार्यक्रमांसाठी आज गडकरी पुण्यात आले होते, त्या वेळी चांदणी चौकातील कामकाजाच्या आढाव्यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. भूसंपादनाबाबत नागरिकांशी चर्चा करूनही तोडगा निघत नाही. तसेच सेवावाहिन्यांचे स्थलांतर करण्यातदेखील अडचणी असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले, त्यामुळे महापालिकेऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन करावे, असा प्रस्ताव आम्ही दिला असल्याचे गडकरी यांच्या निदर्शनास महापालिका अधिकाऱ्यांनी आणून दिले. तेव्हा ‘दिलेल्या मुदतीत काम झाले नाही आणि ठेकेदाराने भरपाई मागितली, तर त्याला जबाबदार महापालिका राहील. ती सर्व भरपाई तुम्हाला द्यावी लागेल. त्यामुळे कामे वेळेत पूर्ण करा,’ अशा शब्दांत महापालिका अधिकाऱ्यांना सुनावले.

कार्यकर्त्यांमुळे आम्ही शिखरावर
मानवी जीवनाशी संबंधित, देश घडविणारे संस्कार देण्याचे आणि दोष कमी करून गुणवत्ता वाढविण्याचे काम रा. स्व. संघ आणि अभाविप या संघटनांनी केले, त्यामुळे असंख्य कार्यकर्त्यांनी देशासाठी समर्पण केले. त्यांनी काम केले नसते, तर आम्हाला शिखरावर जाण्याची संधी मिळाली नसती, अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

‘सानंद- कुशल आणि माणूस नावाचे काम’ या पुस्तकांच्या प्रकाशनाप्रसंगी गडकरी बोलत होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी सहसंघटनमंत्री सदाशिवराव देवधर, अरुण करमरकर, मिलिंद मराठे, भालचंद्र देवधर, मनीषा सोनावणे, प्रदीप नाईक, प्रशांत साठे उपस्थित होते. संघटनेत काम करीत असतानाचे किस्से गडकरी यांनी सांगितले. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर भाष्य करण्याचे मात्र त्यांनी टाळले.

गडकरी म्हणाले, ‘‘देशाची गाडी योग्यरीतीने पुढे न्यायची असेल, तर त्यासाठी कार्यक्षम, समर्पित कार्यकर्त्यांची गरज आहे. पूर्वी परिस्थिती चांगली नव्हती, त्या स्थितीतही लोकांचे दगड-गोटे खात कार्यकर्ते घडत राहिले. त्यातून सदाशिवरावांसारखे कार्यकर्ते घडले. पुढील पिढीतही असे कार्यकर्ते घडविण्याची गरज आहे. त्यासाठी वैचारिक भूमिका, जीवनदृष्टिकोन देण्याचा प्रयत्न संघटनेने केला पाहिजे.’’
‘सिद्धांत, विचारधारा महत्त्वाची आहेच; पण राजकराण आणि समाजकारणासाठी चांगले मानवी संबंध ही खूप महत्त्वाची बाब आहे,’ असा सल्ला गडकरी यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com