ठेकेदार ग्रामसेवक निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पुणे - सरकारी नोकरीत असूनही बायकोच्या नावाने कंपनी स्थापन करून बांधकाम व्यवसाय करणाऱ्या दोन व त्यांना बांधकामासाठी मदत करणाऱ्यासह तीन ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी निलंबित केले. मोहन गर्जे (बकोरी), मुरलीधर बडे (थेऊर) आणि जे. एम. भोंग अशी त्यांची नावे आहेत.

पुणे - सरकारी नोकरीत असूनही बायकोच्या नावाने कंपनी स्थापन करून बांधकाम व्यवसाय करणाऱ्या दोन व त्यांना बांधकामासाठी मदत करणाऱ्यासह तीन ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी निलंबित केले. मोहन गर्जे (बकोरी), मुरलीधर बडे (थेऊर) आणि जे. एम. भोंग अशी त्यांची नावे आहेत.

ठेकेदारी व्यवसायात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे आली होती. त्यामध्ये हवेली तालुक्‍यातील तक्रारींचा समावेश होता. हवेलीत शेतजमिनीच्या क्षेत्रात घट झाली असून, बांधकामांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी, या तालुक्‍यात अन्य तालुक्‍यांच्या तुलनेत मिळकतींचे (प्रॉपर्टी) भाव कित्येक पटीने जास्त आहेत. याचाच फायदा घेण्यासाठी आणि अधिकाधिक नफा कमाविण्याच्या उद्देशाने या दोन ग्रामसेवकांनी त्यांच्या बायकोच्या नावाने ठेकेदारी कंपनीची स्थापना केली होती.

यासाठी त्यांना अन्य एका ग्रामसेवकाने सहकार्य केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी गुरुवारी (ता. २९) सांगितले. 

यापैकी गर्जे आणि बडे यांनी बायकोच्या नावे ठेकेदारी व्यवसाय सुरू केल्याचे, तर भोंग यांनी या दोघांच्या बांधकामांच्या बेकायदा नोंदी करणे, बेकायदा बांधकाम परवानगी देऊन त्यांना मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. हा प्रकार हवेली तालुक्‍यातील मांगडेवाडी येथे भोंग ग्रामसेवकपदी कार्यरत असताना घडला. भोंग सध्या भोर तालुक्‍यात कार्यरत आहेत. 

पुण्याचे तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी एक परिपत्रक काढून, ग्रामपंचायतींकडून बांधकामाच्या नोंदीचे आणि बांधकाम परवाना देण्याचे अधिकार काढून घेतले होते. भोंग यांनी बेकायदा गर्जे आणि बडे यांच्या बांधकामांना परवानगी दिल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ठेकेदारीत सहभागी असल्याच्या कारणावरून ग्रामसेवकांवर करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे.

Web Title: Contractor Gramsevak Suspend crime