ठेकेदारांवर कारवाई हवीच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

शहरात नव्याने केलेल्या ज्या ज्या रस्त्यावर पावसाळ्यात ख्‌डडे पडले आहेत. त्याची संबंधित ठेकेदारांकडून दुरुस्ती करून घेण्यात येणार आहे. त्याबाबत त्यांना पत्र पाठविण्यात आली आहेत. त्यानुसार कामे करून देण्याचे मान्य केले आहे. मात्र, ती न झाल्यास कठोर कारवाई केली जाईल.
राजेंद्र राऊत, प्रमुख, पथ विभाग, महापालिका

""शंकर महाराज उड्डाण पुलावरील उतार असलेल्या भागात काही खड्डे आहेत. ते बुजविण्यात येत आहेत. पुलाचे काम केलेल्या ठेकेदाराकडून नव्याने काम करून घेण्यात येईल. त्याचा करारात उल्लेख आहे. ती कामे होतील.‘‘
नामदेव गंभीरे, कार्यकारी अभियंता, वाहतूक विभाग, महापालिका.

पुणे - जेमतेम दहाच दिवस पाऊस होऊनही शहरातील प्रमुख रस्ते आणि उड्डाण पुलांवर खड्डे पडण्यास सुरवात झाली. रस्ते आणि पुलांची बांधणी करण्यापूर्वी संबंधित ठेकेदारांवर देखभाल-दुरुस्तीचा कालावधी ठरवून त्यानुसार कामे करून घेण्याबाबतचा करारही झाला. मात्र हा करार नावापुरताच राहण्याची चिन्हे असून, रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत ना महापालिका प्रशासन, ना ठेकेदार गंभीर आहे. मुळात, रस्त्यांच्या बांधणीनंतर दीड-दोन महिन्यांत त्यावर खड्डे कसे पडतात, याचा जाब ठेकेदारांना विचारला जात नाही, त्यामुळे खड्डे पडल्याची ओरड होताच, ठेकेदारांना केवळ सूचना, पत्र पाठविण्याचा तोंडदेखलेपणा महापालिका प्रशासन करीत आहे. अशा घटनांमध्ये एकाही ठेकेदारावर कठोर कारवाईचे धाडस प्रशासन का दाखवित नाही, असा प्रश्‍न नागरिकांकडून विचारला जात आहे. दुर्दैवाने महापालिकेच्या अधिकाऱ्याकडे या प्रश्‍नाचे उत्तर नाही.

Web Title: Contractors action Must