पाणीवापर त्वरित नियंत्रित करा

ज्ञानेश्‍वर बिजले
बुधवार, 2 जानेवारी 2019

पिंपरी - महापालिकेने पिण्याच्या पाण्याचा वापर तत्काळ नियंत्रित करावा; अन्यथा उन्हाळ्यात शहरामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे, असा इशारा जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी दिला. पालिका रोज ४८० ते ४९० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी वापरते. ते ४४० एमएलडीपर्यंत नियंत्रित करण्याचे म्हणजेच रोजच्या वापरात दहा टक्के कपात करण्याचे त्यांनी सूचित केले आहे.

पिंपरी - महापालिकेने पिण्याच्या पाण्याचा वापर तत्काळ नियंत्रित करावा; अन्यथा उन्हाळ्यात शहरामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे, असा इशारा जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी दिला. पालिका रोज ४८० ते ४९० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी वापरते. ते ४४० एमएलडीपर्यंत नियंत्रित करण्याचे म्हणजेच रोजच्या वापरात दहा टक्के कपात करण्याचे त्यांनी सूचित केले आहे.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली चार ऑक्‍टोबर रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत महापालिकेने ४४० एमएलडी पाणी घेण्याचा निर्णय झाला होता. जलसंपदा विभागाने त्यासंदर्भात महापालिकेला कळविले होते. दसरा, दिवाळीनंतर पाणीपुरवठा विभागाने ही बाब गटनेत्यांच्या बैठकीत सादर केली. मात्र, राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिला नाही. 

पालिकेने पूर्वीप्रमाणेच पाणी वापर सुरू ठेवल्याने चोपडे यांनी पुन्हा पत्र पाठविले आहे. पत्रात त्यांनी नमूद केले आहे, की महापालिका मर्यादेपेक्षा जादा पाणी वापर करीत आहे. कालवा सल्लागार समितीचे नियोजन व निश्‍चित केलेल्या पाणी कोट्यानुसार रब्बी व उन्हाळा हंगामात सिंचनासाठी पाणी दिले जाईल. महापालिकेने ४४० एमएलडीनुसार पाणी वापर न केल्यास उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध होऊ शकणार नाही. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यासंदर्भात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला सूचना द्याव्यात. पाणी वापराचे अंदाजपत्रक तयार करावे व ते जलसंपदा विभागाला सादर करावे, असे चोपडे यांनी पत्रात म्हटले आहे. 

पवना धरण १८ सप्टेंबरला पूर्ण भरले होते. त्यानंतर पाऊस न झाल्याने तेव्हापासून धरणातील साठा वापरण्यास सुरवात झाली. २०१७-१८ वर्षांच्या तुलनेत धरणांमध्ये ११ टक्के कमी साठा आहे. जूनअखेरपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. ते लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने दहा टक्के पाणी कपात करण्याचे सुचविले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्याबाबत निर्णयही घेण्यात आला. पालिकेने गेल्या वर्षी ६.११ अब्ज घनफूट पाणी वापरले होते. यंदा त्यामध्ये अर्धा टीएमसी घट करावी लागणार आहे.

पाणी कपातीबाबतचा प्रस्ताव पालिका गटनेत्यांच्या बैठकीत सादर करण्यात येईल. निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात येईल. पूर्वी आठवड्यात एक दिवस पाणी कपातीचा प्रस्ताव होता. पुढे दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागेल. 
- मकरंद निकम,  सह शहर अभियंता,  पाणीपुरवठा विभाग, महापालिका

पवना धरणातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)  
५.७५ टीएमसी - आजचा 
६७.५५ - टक्के
६.७१ टीएमसी - गेल्या वर्षी एक जानेवारीचा   
७८.८८ - टक्के

Web Title: Control the use of water quickly