सोयीच्या उमेदवारांसाठी ‘फिल्डिंग’!

सोयीच्या उमेदवारांसाठी ‘फिल्डिंग’!

पुणे - महापालिका निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागात सोयीचे उमेदवार समोर यावेत, तसेच विद्यमान नगरसेवक परस्परांची लढत टाळण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी समोरच्या पक्षाच्या शहराध्यक्षापासून विधानसभा अध्यक्षांपर्यंत थेट किंवा आडबाजूने संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुल्यबळ प्रतिस्पर्धी येऊ नये म्हणूनही अनेक विद्यमान प्रयत्नशील आहेत. यासाठी मोर्चेबांधणी आता प्रत्येक प्रभागात सुरू झाली आहे.   

महापालिका निवडणूक चार सदस्य प्रभाग पद्धतीने होणार आहे. प्रत्येक प्रभागात दोन महिलांचे आरक्षण आहे. त्यातच अनुसूचित जाती, जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्गाचेही आरक्षण आहे. परिणामी काही प्रभागांत विद्यमान नगरसेवकांमध्ये लढती होण्याची शक्‍यता आहे. मात्र, शक्‍य त्या ठिकाणी विद्यमानांमध्ये होणाऱ्या लढती टाळता येतील का, याबाबतही चाचपणी सुरू आहे. त्यासाठी खुल्या गटातील काही नगरसेवक आणि प्रमुख इच्छुकांनी नागरिकांच्या मागास प्रवर्गातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे; तसेच एखाद्या प्रभागात विरोधी पक्षाची ताकद फारशी नसेल, तर त्या ठिकाणी विशिष्ट उमेदवार सोयीचा ठरू शकेल, असे गृहितक बांधले जात आहे. त्या उमेदवाराला काही प्रमाणात रसद पुरविण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली आहे; तसेच विरोधी पक्षाचा उमेदवार सोयीचा यावा, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी समोरच्या पक्षातील विधानसभा अध्यक्षापासून शहराध्यक्षांपर्यंत संपर्क साधण्यात येत आहेत. 

प्रभाग ३८, राजीव गांधी उद्यान- बालाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर दत्तात्रेय धनकवडेही नागरिकांच्या मागास प्रवर्गातून, तर मनसेचे वसंत मोरे खुल्या गटातून निवडणूक रिंगणात उतरतील अशी चिन्हे आहेत. प्रभाग ११ रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसेचे नगरसेवक दीपक मानकर नागरिकांच्या मागास प्रवर्गातून, तर काँग्रेसचे चंदू कदम खुल्या गटातून निवडणूक लढविणार आहेत. प्रभाग २२ मधून राष्ट्रवादीचे नगरसेवक चेतन तुपे यांनी खुल्या गटातून आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे; तसेच प्रभाग क्रमांक १ कळस- धानोरीमध्ये राष्ट्रवादीच्या रेखा टिंगरे, प्रभाग ३२ वारजे माळवाडीमध्ये दिलीप बराटे, प्रभाग १० बावधन-कोथरूड डेपोमध्ये बंडू केमसे, प्रभाग २१ मध्ये काँग्रेसचे बंडू गायकवाड यांनीही खुल्या आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर यांचीही दोन्ही गटांतूून निवडणूक लढण्याची तयारी आहे. 

शहराच्या मध्यभागातील प्रभाग १५ मध्ये शनिवार पेठ- सदाशिव पेठमध्ये मनसेच्या नगरसेविका रूपाली पाटील नागरिकांच्या मागास प्रवर्गातून निवडणूक लढविणार असून, त्यांच्यासमोर भाजपमधून नवा उमेदवार येण्याची शक्‍यता आहे. या प्रभागात उर्वरित तिन्ही उमेदवार भाजपचे विद्यमान नगरसेवक आहेत. प्रभाग १६ मधून भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनीही नागरिकांचा मागास प्रवर्ग किंवा खुल्या गटातून लढण्याची तयारी केली आहे. तुल्यबळ उमेदवाराशी लढत टाळण्यासाठी समोरच्या पक्षाच्या विशिष्ट कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुकांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com