पुण्यातील पन्नास चौक होणार पोलिसमुक्त

पांडुरंग सरोदे 
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

चौकातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी सिग्नल यंत्रणेबरोबरच वाहतूक पोलिसही आलाच; पण लवकरच हे चित्र बदलणार आहे. चौक पोलिसमुक्त (कॉप फ्री जंक्‍शन) होणार असून, तेथे सीसीटीव्हींची नजर राहणार आहे. शहरातील ५० चौकांत ही योजना राबविण्यात येणार आहे. 

पुणे - चौकातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी सिग्नल यंत्रणेबरोबरच वाहतूक पोलिसही आलाच; पण लवकरच हे चित्र बदलणार आहे. चौक पोलिसमुक्त (कॉप फ्री जंक्‍शन) होणार असून, तेथे सीसीटीव्हींची नजर राहणार आहे. शहरातील ५० चौकांत ही योजना राबविण्यात येणार आहे. 

पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी नुकतेच या योजनेबाबत सूतोवाच केले. त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरवातही केली आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज देशमुख यांनी या संकल्पनेस मूर्त स्वरूप दिले आहे. ‘कॉप फ्री जंक्‍शन’साठी शहरातील महत्त्वाचे, गर्दी असलेले ५० चौक निवडण्यात येणार आहेत. तेथे सध्या एक किंवा त्यापेक्षा जास्त पोलिस कार्यरत आहेत, अशा ठिकाणी वाहतूक पोलिस कर्मचारी न ठेवता तेथील चौकाचे संपूर्ण नियंत्रण सीसीटीव्हीद्वारे करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवून कारवाई केली जाईल. 

येथे असेल यंत्रणा
  डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यांतर्गतचा परिसर  
  विश्रामबाग पोलिस ठाण्यांतर्गतचा परिसर
  नाना पेठेतील मुख्य ठिकाणे 
  पुरम चौक, टिळक रस्ता

राज्यामध्ये पहिल्यांदाच ‘कॉप फ्री जंक्‍शन’ हा प्रयोग पुण्यामध्ये राबविला जाणार आहे. या प्रयोगामुळे वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण होईल. सीसीटीव्हीमुळे तेथे पोलिस कर्मचारी लागणार नाही. 
- डॉ. के. वेंकटेशम,  पोलिस आयुक्त 

पहिल्या टप्प्यात २३ ठिकाणी ‘कॉप फ्री जंक्‍शन’ राबवीत आहोत. पोलिसांऐवजी तेथे सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले जाईल. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील काम सुरू होईल.
- पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cope free junction in pune