कोरोनामुळे बदलला आळंदी किर्तन प्रवचनाचा ट्रेंड

विलास काटे
Tuesday, 27 October 2020

डामडौल करून होणारे हरिनाम सप्ताह गावोगावी बंद पडले. फेसबुकसारख्या सोशल मिडियाचा आधाराने ऑनलाईन किर्तन, प्रवचनाचा नवा ट्रेंड संप्रदायात सुरू झाल्याचे चित्र आहे. पारंपारिक गावाकडच्या श्रोत्याबरोबर ऑनलाईनमुळे सुशिक्षित शहरी श्रोताही न कळत वळू लागला आणि लाईक कमेंट करू लागला.

आळंदी :  किर्तन प्रवचन आहे मात्र, मंडप नाही, डामडौल नाही, ध्वनिक्षेपकांची आणि श्रोत्यांची गर्दी नाही आणि मानधनही नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली आठ महिन्यांपासून राज्यभरात वारकरी संप्रदायातील हजारो किर्तनकार प्रवचनकार, वारकरी आर्थिक विवंचनेत आहे.

डामडौल करून होणारे हरिनाम सप्ताह गावोगावी बंद पडले. फेसबुकसारख्या सोशल मिडियाचा आधाराने ऑनलाईन किर्तन, प्रवचनाचा नवा ट्रेंड संप्रदायात सुरू झाल्याचे चित्र आहे. पारंपारिक गावाकडच्या श्रोत्याबरोबर ऑनलाईनमुळे सुशिक्षित शहरी श्रोताही न कळत वळू लागला आणि लाईक कमेंट करू लागला.

दसऱ्याला सोने-चांदीची अपेक्षेपेक्षा जास्त विक्री; पुण्यातील सराफांनी केला दावा​

कोरोनाने अनेकांचे जिवनमान बदलले. याला वारकरी संप्रदायही अपवाद ठरला नाही. सरूवातीला देवाचे नामस्मरण आणि पारममार्थीक आनंदासाठी वारकरी झालो. मात्र हळूहळू कार्यक्रमांची संख्या वाढू लागली आणि हा आनंदाचे साधन आता आमच्या कुटूंब व्यवस्था चालविण्याचे साधन कधी झाले कळालेच नाही. किर्तन प्रवचनातून मिळालेल्या मानधनावर संसार चालू लागला, मात्र कोरोनामुळे सगळे होत्याचे नव्हते झाले. पूर्वीपासून ज्यांची परंपरा आहे त्यांना मोठाले मानधन मिळे. मात्र आम्हाला ना परंपरा ना जादा अनुयायी. खेडे गावात किर्तन प्रवचन करून आम्हाला तुटपुंजे मानधन मिळे त्यात आम्ही कुटूंबासाठी तसेच स्वत:च्या शिक्षणासाठी खर्च करत. मात्र गेली आठ महिने काहीच नाही. इतरांप्रमाणेच आमचीही परवड झाल्याचे बाबा महाराज यांनी सांगितले.

'मुख्यमंत्र्यांनी बोलण्यापेक्षा करून दाखवावे!'

संजय महाराज कावळे म्हणाले,''लॉकडाऊनमुळे कार्यक्रमाची व्यस्तता नाही. प्रवास नसल्याने शारिरीक स्वास्थ मिळाले. संत चरित्राचे वाचन, चिंतन वाढले याचा आनंद वाटतो. तोटा असा की, फिरणे बंद झाल्याने लोकांशी संपर्क कमी झाला. लोकांमधे गेले की, समाज कळतो. मोबाईलमुळे ऑनलाईन किर्तने सुरू आहेत मात्र, खेडोपाडी रेंज नसल्याने आणि वृद्द, अशिक्षित लोकांना हाताळता येत नसल्याने ते लोक या सुखाला मुकले. काळानुरूप बदल स्विकारणे गरजेचे आहे.''

महंत पुरूषोत्तम महाराज पाटील म्हणाले, ''हरिनाम सप्ताहाचे माध्यम बदलले आणि वारकऱ्यांनी सर्वत्र वापर सुरू केला. खर्च वाचला मात्र, तळागाळापर्यंत ऑनलाईनचे तंत्रज्ञान पोचले नाही. गावाकडच्या माणसाला प्रत्यक्ष ऐकण्यात आनंद वाटतो. वक्ता आणि श्रोता भेटला की, कार्यक्रमाला रंगत येते ती ऑनलाईन नाही. ऑनलाईनचा श्रोत्यापैकी प्रत्येकजण भक्तीमार्गातलाच आहे असे नाही. संत विचारांना मानणारा वर्ग हवा. श्रोता आणि परमार्थाची सांगड घालण्यासाठी हरिनाम सप्ताह हवेच.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे किर्तनकार, प्रवचनकारांबरोबरच त्यांच्या सोबत टाळ, पखवाज वाजविणाऱ्यांचेही हाल झाले. त्याचप्रमाणे सांप्रदायिक गायन, वादन करणारे त्यांनाही कार्यक्रम नाही. मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाला. एप्रिल मे महिन्यातील रामनवमी, हनुमान जयंती, गुडीपाडवा निमित्त भरणारे हरिनाम सप्ताह झालेच नाही. त्यानंतर आषाढी वारी, श्रावण महिनाही तसाच गेला. सप्ताहामुळे मंडप, आचारी, वाढपी, लाईट, जागा मालक, वाहन व्यवस्था यांनाही उत्पन्न मिळे ते बंद झाले. राज्यात सर्वात जास्त अन्नदान धार्मिक कार्यक्रमात होत तेही बंद झाले. आता दिवाळीनंतर सुरळित होईल अशी आशा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona changed the trend of Alandi kirtan discourse