कोरोनायोद्ध्यांना सलाम! बारामतीत कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहावर करताहेत अंत्यसंस्कार

Corona infected dead body cremated by employee of Baramati Municipal Health and Parks Department
Corona infected dead body cremated by employee of Baramati Municipal Health and Parks Department

बारामती : कोरोनाशी दोन हात करताना अनेक घटक अक्षरशः जिवावर उदार होऊन आपले काम करीत आहेत. बारामतीत नगरपालिकेच्या आरोग्य व उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे काम केले जात आहे. या कर्मचाऱ्यांनी हे काम करताना जे धाडस दाखविले आहे, ते प्रशंसनीय आहे. अनेक कुटुंबांशी या कामाने या कर्मचाऱ्यांचे भावनिक नाते जोडले गेले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी

येथे ► क्लिक करा

कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर रुग्णाला समाजाकडून जी वागणूक मिळते, तो प्रवास अगदी प्रकृती चिंताजनक होईपर्यंत व मृत्यूपर्यंत सुरुच राहतो. रुग्णाला भेटीस परवानगी नसणे व सर्वांच्याच मनात संसर्गामुळे असलेली भीती यामुळे रुग्ण एकाकी पडतो. यातच मृत्यू झाल्यानंतर संबंधिताला वाली नसल्यासारखीच त्याची अवस्था होते. इच्छा असूनही नातेवाईक जाऊ शकत नाही किंवा अंत्यसंस्काराच्या वेळेसही उपस्थित राहता येत नाही. 

अशा वेळेस नगरपालिकेचेच हे कर्मचारी अक्षरशः नातेवाईक बनून मदतीला धावून येतात. मृत्यूची वर्दी मिळाल्यानंतर यांचे काम सुरु होते, लाकडे गोळा करण्यापासून ते दवाखान्यातून मृतदेह पिशवीमध्ये पॅक करुन रुग्णवाहिकेद्वारे तो स्मशानभूमीपर्यंत पोहोचविणे व पीपीई किट परिधान करुन लाकडे रचून त्यावर मृतदेह ठेवून त्याला सन्मानपूर्वक अग्नि देण्याचे काम रक्ताचे नाते असल्यासारखे हे कर्मचारी 1 जुलैपासून करीत आहेत.

हे वाचा - पुण्यात भाविकांची गर्दी टाळण्यासाठी पालिका, पोलिसांचा बंदोबस्त

मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक राजेंद्र सोनवणे, सुभाष नारखेडे, विजय शितोळे, माजिद पठाण आणि वीस कर्मचाऱ्यांचे पथक चोवीस तास या कामात कार्यरत आहे. अगदी भरपावसात व मध्यरात्रीही अंत्यसंस्काराची अवघड जबाबदारी या सर्वांनी पार पाडली आहे. 

आजपर्यंत बारामती शहर व तालुक्यासह येथे मृत्यू झालेल्या इतर तालुक्यातील 56 मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे काम या टीमने केले आहे. अंत्यसंस्कार करताना आपल्याच कुटुंबातील व्यक्ती असल्याच्या आपलेपणाच्या भावनेतून हे कर्मचारी काम करतात हे यातील वैशिष्टय. काल बारामतीत एकाच दिवशी या बहाद्दर कर्मचाऱ्यांनी सात मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. संसर्गाचा कमालीचा धोका असतानाही जिवावर उदार होत या कर्मचाऱ्यांकडून सुरु असलेले हे काम उल्लेखनीय तर आहेच पण समाजात आजही माणूसकी टिकून आहे, याचे प्रतिक असे हे काम आहे. समाजासाठी लढणा-या या कोरोनायोध्द्यांचा विशेष सत्कार होण्याची आज खरी गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com