दौंडकरांनो, सावध व्हा...कोविड केअर सेंटर पुन्हा हाउसफूल

daund
daund

दौंड (पुणे) : दौंड शहरात मागील दहा दिवसांत तब्बल ४५ नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा झाली. बाधितांची संख्या वाढल्याने महिन्याभरात दुसऱ्यांदा उप जिल्हा रूग्णालयातील एक इमारत पुन्हा खाली करून तेथे बाधितांवर उपचार केले जात आहेत.

दौंड शहर व तालुक्यात १ मे ते १० जुलै या कालावधीत एकूण १५४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. बाधितांमध्ये दौंड शहरातील ८८, शहरातील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सातचे ४६, गट क्रमांक पाचचे ५, पोलिस, इंडियन रिझर्व्ह बटालियनचे (आयआरबी) १५ पोलिस यांचा समावेश होता. त्यापैकी १२९ जण बरे झाले. बाधितांचे वयोमान ७ ते ८२ या दरम्यान आहे. दौंड शहरात तीन महिलांसह एकूण सात जणांचा २५ मे ते ७ जुलै या कालावधीत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दौंड उप जिल्हा रुग्णालयाच्या वतीने शहरातील एका खासगी शिक्षण संस्थेची इमारत अधिग्रहित केल्यानंतर तेथे ३० रुग्णांवर उपचार करणे शक्य होईल, असे सुसज्ज कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले. उपचारांसह संशयित रुग्णांच्या घशातील स्त्राव (स्वॅब) येथे घेऊन तपासणीसाठी पुणे येथे पाठविले जातात. १३ जून रोजी बाधितांची संख्या वाढल्यानंतर वाढल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून उप जिल्हा रूग्णालय आवारातील कर्मचारी निवास इमारत खाली करण्यात आली होती. त्या मधील १२ सदनिकांमध्ये बाधितांसाठी ३६ खाट तयार करून तेथे उपचार सुरू आहेत. चालू आठवड्यात पुन्हा रुग्ण वाढले. दरम्यान १० जुलै रोजी दौंड शहरातील ५२ व तालुक्यातील लिंगाळी, कुरकुंभ, पाटस, मलठण, सोनवडी व गोपाळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील १२, असे एकूण ६४ बाधितांवर या दोन कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली. 
 
दोनशे खाटांची तयारी
रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन दौंड- लिंगाळी रस्त्यावरील एका शिक्षण संस्थेची जागा कोविड केअर सेंटरसाठी महसूल प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली आहे. त्या ठिकाणी २०० खाटांची व्यवस्था करणे शक्य आहे, अशी माहिती डॅा. संग्राम डांगे यांनी दिली. 
  
Edited by : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com