पुण्यात काय सुरुय? कोरोनाग्रस्तांना केअर सेंटरमध्येच नो एन्ट्री?

टीम ई-सकाळ
मंगळवार, 30 जून 2020

सातववाडी- गोंधळेनगर या भागात कोरोनाचा संसर्ग झालेले अनेक रूग्ण आहेत. अनेक नागरिकांनी स्वतःहून खासगी रूग्णालय व लॅबमधून कोरोना टेस्ट करून घेतल्या आहेत. त्यातील अनेक रूग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले आहे.

हडपसर : कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांनांना कोरोना केअर सेंटर ( सीसीसी ) मध्ये दाखल करून न घेता पाच पाच दिवस त्यांना घरीच ठेवले जात आहे. तसेच बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांना व नागरिकांना कॅारंटाईन केले जात नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिका-यांना उपचाराबाबत विनंती केली असता उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढल्याची तक्रार करीत सामजाजिक कार्यकर्ते नगरसेवक मारूती तुपे व प्रशांत सुरसे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी हडपसर-मुंढवा सहाय्यक आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सहाय्यक आयुक्त वैभव कडलक यांनी हा प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल, असे अश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.  

Video : पुंडलिका वरदे हरी विठ्ठलच्या गजरात तुकोबांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ | eSakal 

सुरसे म्हणाले, सातववाडी- गोंधळेनगर या भागात कोरोनाचा संसर्ग झालेले अनेक रूग्ण आहेत. अनेक नागरिकांनी स्वतःहून खासगी रूग्णालय व लॅबमधून कोरोना टेस्ट करून घेतल्या आहेत. त्यातील अनेक रूग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे या रूग्णांना कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करावे अशी अनेकदा विनंती केली. मात्र त्यांच्याकडून कोणतीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे याला जबाबदार असणारे अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. 

सनईच्या सुरात अक्षता पडणार...तोच पोलिसांची गाडी आली...  

हडपसर-मुंढवा सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरिक्षक संजय धनवट म्हणाले, ज्या नागरिकांनी खासगी रूग्णालये अथवा लॅबमधून कोरोना टेस्ट केली आहे व ती टेस्ट पॅाझिटिव्ह आहे. त्या रूग्णांची यादी या रूग्णालये व लॅबने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे देणे आवश्यक असते. मात्र ती दिली जात नाही. त्यामुळे या रूग्णांची माहिती आम्हाला समजत नाही. आरोग्य विभागाकडून आमच्या हद्दीतीलस रूग्णांची जी यादी मिळते, त्यानुसार तातडीने आम्ही या रूग्णांना कोरोना केअर सेंटरमध्ये पाठवतो. याप्रसंगी विशाल वाळके, गणेश जगताप, हरी शेलार, चेतन चव्हाण यांच्यासह अनेक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. सुरसे यांनी अधिका-यांना धारेवर धरले. त्यानंतर अधिकारी व कर्मचा-यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. तसेच महापालिकेच्या विविध विभाग व अधिका-यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona positive patient do not admitted care center in hadapsar area