शिरूरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, पाच डाॅक्टर, दहा आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना 

corona
corona

शिरूर (पुणे) : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कंपाउंडर व परिचर, अशा तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना एकाच दिवसात कोरोनाची बाधा झाल्याने वैद्यकीय वर्तुळात चिंता पसरली आहे. यापूर्वी रांजणगाव गणपती येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला बाधा झाली होती, तर तालुक्यातील पाच डॉक्टरांना व किमान दहा आरोग्य कर्मचाऱ्यांना बाधा झाल्याने वैद्यकीय क्षेत्र हादरला आहे.

शिरूर तालुक्याच्या विविध भागात सापडलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील जवळपास ८४ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी ४८ जणांचे रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आले. कवठे येमाई येथे गेल्या आठ दिवसांपूर्वी तीन कोरोनाबाधित रूग्ण सापडले. त्यांची तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी व उपचार झालेले असल्याने या केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह सर्व स्टाफचे स्वॅब टेस्टिंगसाठी पाठविले होते. त्यात एक तीस वर्षीय वैद्यकीय अधिकारी, २८ वर्षीय कंपाउंडर, ३५ वर्षीय अटेंडंट यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. बेट भागातील एका मेडिकल दुकानदाराचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित बाधित आरोग्य कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले असून, प्राथमिक आरोग्य केंद्रात पर्यायी व्यवस्था केली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली.

गेल्या महिन्यात रांजणगाव गणपती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यालाही कोरोनाची बाधा झाली होती. त्याचबरोबर आतापर्यंत तालुक्यातील पाच डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, खासगी रूग्णालयांमध्ये काम करणारे कंपाउंडर, सफाई कर्मचारी व पॅथचालक, असे मिळून किमान १५ जणांना आतापर्यंत बाधा झाली आहे.  कोरोनाच्या या संकटाचा नेटाने सामना करण्यात आघाडीवर असलेले आरोग्य कर्मचारीच आता कोरोनाच्या फेऱ्यात अडकत चालल्याने वैद्यकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

दैनंदीन रूग्ण दवाखान्यात येतच असतात. त्यांना पाहताक्षणीच ते कोरोनाबाधित आहेत, हे आमच्याही लगेच लक्षात येणे कठीण आहे. लक्षात आले तरी प्राथमिक पाहणी करून त्यांची तपासणी करावीच लागते. आम्ही खबरदारी घेऊन तपासणी करतो आणि कोरोनासदृष लक्षणे आढळल्यास त्यांना शासकीय रूग्णालयात पाठवितो. तथापि, प्राथमिक तपासणी आम्हाला करावीच लागते. अशावेळी संसर्गाची भिती असतेच. पण, पूर्वतपासणी व ही प्रक्रिया टाळता येणे देखील शक्य नसल्याचे अनेक डॉक्टरांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com