esakal | लॉकडाऊनच्या चौथा दिवशीही बारामतीत कोरोनाची स्थिती चिंताजनकच!
sakal

बोलून बातमी शोधा

corona situation is serious even on the fourth day of lockdown in Baramati

लॉकडाऊन होऊन आजचा चौथा दिवस आहे, शहरातील व्यापारपेठ बंद आहे, लोकांची गर्दी कमी झाली असली तरी अजूनही त्याचे परिणाम दिसून येत नाहीत, असे बारामतीत चित्र आहे. 

लॉकडाऊनच्या चौथा दिवशीही बारामतीत कोरोनाची स्थिती चिंताजनकच!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती : शहरातील कोरोनाची स्थिती आजही चिंताजनक या स्वरुपात मोडणारी होती. आज 112 रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे, मात्र अजून चिंतेची बाब म्हणजे अजून 82 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत, त्यामुळे आजही कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय राहणार हे स्पष्ट झाले आहे. गेल्या 24 तासात शहरातील 69 तर ग्रामीण भागातील 43 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉकडाऊन होऊन आजचा चौथा दिवस आहे, शहरातील व्यापारपेठ बंद आहे, लोकांची गर्दी कमी झाली असली तरी अजूनही त्याचे परिणाम दिसून येत नाहीत, असे बारामतीत चित्र आहे. 

हेल्पलाईनची बारामतीकरांना तातडीची गरज....
लक्षणे आढळल्यानंतर कोठे जायचे, पॉझिटीव्ह आढळल्यावर कोणाला संपर्क करायचा, रुग्णवाहिकेची गरज आहे, अचानक रुग्णाला त्रास होऊ लागला, कोणत्या रुग्णालयात जागा आहे या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी बारामतीत तातडीने किमान आठ ते दहा हेल्पलाईनचे मोबाईल क्रमांक सुरु करण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्यांच्या ओळखी आहेत, त्यांची कामे पटापट होतात, मात्र ज्यांची ओळख नाही त्यांना कुणी वालीच नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्या मुळे कोविडविषयी कोणतीही शंका असली तरी संबंधितांना योग्य माहिती त्वरेने पुरविण्यासाठी अशी हेल्पलाईन व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे.
 
पॉझिटीव्ह आलाय...घाबरुन जाऊ नका....!
ज्या रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत पण ज्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, त्यांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही, त्यांना जर दवाखान्यात दाखल व्हायचे असेल तर त्यांना बेड उपलब्ध करुन दिला जाईल, मात्र बेड उपलब्ध होईपर्यंत अशा रुग्णांनी आपापल्या घरी कोणाच्याही संपर्कात न येता विलगीकरणात राहावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे. 

दृष्टीक्षेपात बारामतीचा आढावा
•    आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या- 1767
•    उपचाराखाली असलेले रुग्ण- 1010
•    आजपर्यंत कोरोनाने मृत्यूमुखी पडलेले रुग्ण- 51
•    पॉझिटीव्ह असलेले मात्र लक्षणे नसलेले रुग्ण- 506
•    सौम्य लक्षणे असलेले रुग्ण- 357
•    मध्यम लक्षणे असलेले- 74
•    ऑक्सिजनवर असलेले रुग्ण- 51
•    व्हेंटीलेटरवर असलेले रुग्ण- 22
•    बरे झालेल्या रुग्णांची संख्या- 721

दाखल रुग्णांची दवाखानानिहाय स्थिती खालील प्रमाणे
•    रुई ग्रामीण रुग्णालय- 25
•    सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय- 94
•    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- 244
•    नटराज नाट्य मंडळ कोविड सेंटर- 100
•    बारामती हॉस्पिटल- 44
•    विविध खाजगी रुग्णालय- 81
•    घरी विलगीकरणातील रुग्ण संख्या- 416
•    पुणे येथे उपचार घेत असलेले रुग्ण- 6