कोरोना सर्वेक्षणाचे दिवसाला फक्त 30 रुपये 

anganwadi-sevika
anganwadi-sevika

पुणे - जीव धोक्‍यात घालून कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात जायचं... त्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घ्यायचा अन्‌ दिवसाला मानधन केवळ 30 रुपये, तेही गेल्या मार्च महिन्यांपासून मिळालेले नाही. सरकारकडून केवळ आश्वासनच मिळतेय... ही खंत आहे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका 35 वर्षीय आशा स्वयंसेविकेची. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"माझे बीकॉम. पर्यंत शिक्षण झाले आहे. माझ्यासारख्या ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या काही आशा सेविका महिन्याला एक हजार रुपयांच्या मानधनावर काम करीत आहेत. सर्वेक्षणाचे काम करण्यास नकार दिल्यानंतर मला राजीनामा देऊन सोडून जा, असे धमकावण्यात आले. घरातील कामे सांभाळून गरोदर मातांचे सर्वेक्षण किंवा इतर आरोग्यविषयक कामे केल्यास मानधन मिळते. म्हणून हे काम स्वीकारले. परंतु आता केवळ कोरोनाचेच रुग्ण आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत ड्युटी. युनिफॉर्म म्हणून साडी घेण्यासाठी गणवेश भत्ता दिला. परंतु दररोज पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना होम क्वारंटाइन करायचं. त्यांच्या संपर्कातील व्यक्तीला लक्षणे असतील त्यांना रुग्णालयात दाखल करायचं, ही कामे करण्यासाठी झोपडपट्टीत, चाळीत सगळीकडे फिरावे लागते. काही इमारतीमध्ये पाच-पाच मजले पायऱ्या चढून जावे लागते. कोरोना बाधितांच्या सर्वेक्षणाचं काम करावं लागत असल्यामुळे मला घरात पती आणि मुलांपासून दूरच राहावे लागते. माझे पती हातगाडीवर स्नॅक्‍सचा व्यवसाय करतात. परंतु कोरोनामुळे तोही व्यवसाय ठप्प आहे. घर चालवणं अवघड झालंय...' अशी व्यथा या आशा सेविकेने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

आशा सेविकांची संख्या 
पिंपरी-चिंचवड महापालिका : सुमारे 225 
पुणे महापालिका : सुमारे 300 
पुणे जिल्हा : 2800 

"कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आरोग्य सुविधा, जम्बो हॉस्पिटल आणि इतर उपायोजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्र्यांनी सर्वेक्षण करण्यासाठी आशा सेविकांना सायकल देण्याची घोषणा केली होती. मात्र, सर्वेक्षण करण्यासाठी पायीच फिरावे लागतेय. दररोज 30 रुपयांऐवजी किमान तीनशे रुपये मानधन द्या, अशी साधी मागणी आहे. परंतु आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अधिकारी आणि महापालिकेतील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत...' 

आशा सेविकांची सरकारकडून "निराशा' 
- मुंबई, ठाणे महापालिकेच्या धर्तीवर गेल्या चार महिन्यांचे आणि यापुढेही दररोज तीनशे रुपयेप्रमाणे मानधन द्यावे. 
- ग्रामीण भागानुसार शहरी भागातही गटप्रवर्तकांची नेमणूक करण्यात यावी 
- स्वसंरक्षणासाठी मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट उपलब्ध करून द्यावेत. 


महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका संघाच्यावतीने आम्ही मागण्यांबाबत सतत पाठपुरावा करीत आहोत. आशा सेविकांच्या मानधनात वाढ करून राज्य सरकारने न्याय द्यावा. 
- एम. ए. पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com