Corona Update - पुण्यात दर सोमवारी चाचण्यांची संख्या होतेय कमी? आज १९४५ नवे रुग्ण

गजेंद्र बडे
Tuesday, 29 September 2020

पुणे जिल्ह्यात फक्त  दर सोमवारीच कोरोना चाचण्यांची संख्या कमी केली जात आहे. नेमक्या या चाचण्या सोमवारीच का कमी केल्या जातात, हा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यात फक्त  दर सोमवारीच कोरोना चाचण्यांची संख्या कमी केली जात आहे. नेमक्या या चाचण्या सोमवारीच का कमी केल्या जातात, हा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.  आज (ता.२८) जिल्ह्यात ९ हजार ५४३ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दिवसभरातील एकूण चाचण्यांमध्ये १ हजार ९४५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. 

रविवारी (काल) दिवसभरात एकूण १३ हजार २४६ चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यापैकी ३ हजार ३१३ नवे रुग्ण आढळून आले होते. दरम्यान, मागच्या सोमवारीही (ता.२१ सप्टेंबर) कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी करण्यात आले होते. मागील सोमवारी ८ हजार ५९६ चाचण्या घेण्यात आल्या होत्या.

पुणे शहरात दररोज पावणेसहा ते सहा हजार चाचण्या घेण्यात येतात. यानुसार कालही शहरात ५ हजार ६१४ चाचण्या घेण्यात आल्या होत्या. आज मात्र शहरात केवळ ३ हजार २१२ चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

हे वाचा - सावधान! कोरोनाच्या नावावर कोणीही घरी येतंय; आयुक्तांकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना

दिवसभरात आढळून आलेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ७७९ जण आहेत. शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये ५५४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ४३७ , नगरपालिका क्षेत्रात १५७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १८ नवे रुग्ण सापडले आहेत.

दरम्यान, आज ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ३३ रुग्ण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील १०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १२, नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही काल (ता. २७) रात्री ९ वाजल्यापासून आज (ता. २८) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

हे वाचा - कोरोनावर मात करण्यासाठी गणरायाकडे साकडे; दगडूशेठ गणपतीसमोर सलग 15 दिवस वेद पठण

आज ३ हजार १३० जण  कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार १०५, पिंपरी चिंचवडमधील ९५९,जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७४३, नगरपालिका क्षेत्रातील २६४ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील ५९ जण आहेत. दरम्यान, आतापर्यंत ६ हजार ३५९ लैरुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे  जिल्ह्याच्या बाहेरील २४९ जण आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona update pune monday 1945 new cases and 59 death