‘कोरोना’चा औद्योगिक क्षेत्रालाही ताप 

‘कोरोना’चा औद्योगिक क्षेत्रालाही ताप 

पिंपरी - चीनमधील ‘कोरोना’ विषाणूमुळे औद्योगिक क्षेत्रावरही परिणाम झाला असून, उत्पादनासाठी आवश्‍यक सुट्या भागांची आयात चार आठवड्यांपासून ठप्प झाली. यावर मार्ग काढण्यासाठी कंपन्यांनी अन्य देशांतून पर्याय उपलब्ध होऊ शकतो का, याची चाचपणी सुरू केली आहे.

‘कोरोना’ विषाणूमुळे चीनमधील अर्थव्यवस्थेवर झाला आहे. त्यामुळे तेथून अन्य देशांत होणारी आयात पूर्णपणे थांबली आहे. राज्यात पुणे जिल्ह्यातील चाकण, रांजणगाव, तळेगाव या भागांमध्ये अनेक ऑटोमोबाइल कंपन्या आहेत, त्यापैकी बहुतेक कंपन्या सुट्या भागांची आयात चीनमधून करतात. चीन खालोखाल कोरिया, जपानमधून सुट्या भागांची आयात मोठ्या प्रमाणात होत असते. 

वस्तुस्थिती काय? 
ऑटोमोबाइल क्षेत्राबरोबरच सौर उपकरणांसाठी लागणारे सुटे भाग तयार करण्यात चीन अव्वल आहे. कोरोना विषाणूमुळे सुट्या भागांची आयात बंद होईल, याचा अंदाज कोणालाही नव्हता. भारतामध्ये सध्या मुळातच मंदीचे वातावरण आहे. ऑटोमोबाइल कंपन्यांमध्ये उत्पादन सुरू असले, तरी बाजारपेठेत मात्र नव्या वाहनांना अपेक्षित मागणी दिसत नाही. नजीकच्या काळात ‘कोरोना’चा संसर्ग वाढल्यास त्याचा थेट परिणाम नव्या वाहनांच्या उत्पादननिर्मितीवर होणार आहे. त्यामुळे भविष्यात उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवताना सुट्या भागांची चणचण जाणवू नये, यासाठी वाहने आणि इंजिनिअरिंग उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी कोरिया, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया अशा देशांतून सुटे भाग मिळू शकतात का, याची चाचपणी सुरू केली आहे. याबरोबरच काही उत्पादक आपल्याला आवश्‍यक असणारे सुटे भाग भारतात कुठे तयार होऊ शकतात का, याचाही शोध घेत आहेत. 

हे सुटे भाग चीनमधून
ऑटोमोबाइल कंपन्यांकडून तयार करण्यात येणाऱ्या कार, दुचाकी वाहनांसाठी वापरण्यात येणारे इलेक्‍ट्रिक वायरिंग, लायटिंग सिस्टिम, विविध प्रकारची सर्किट्‌स, सोलरचे सुटे भाग आदी उत्पादनांची आयात चीनमधून होते. अन्य देशांच्या तुलनेमध्ये उत्पादन तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये चीन आघाडीवर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही उत्पादनाची निर्मिती करण्याची क्षमता सर्वाधिक आहे, त्यामुळे देश विदेशांतील अनेक उत्पादक कंपन्या त्यांच्याकडून सुट्या भागांची खरेदी करतात. 

चार चिनी कंपन्यांची गुंतवणूक
उत्पादन क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या चीनमधल्या चार कंपन्यांनी तळेगाव, चाकणमध्ये गुंतवणूक केली आहे. उत्पादन प्रकल्प लवकर सुरू कसा होईल, यासाठी चीनमधल्या कंपन्या कायम प्रयत्नशील असतात. मात्र, सध्या तिथे पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे या कंपन्यांचे उत्पादन सुरू होण्यासाठी विलंब होण्याची शक्‍यता आहे. 

सध्या देशामध्ये मंदीचे वातावरण असल्याने ऑटोमोबाइल किंवा अन्य उद्योगातील उत्पादनांच्या निर्मितीवर लगेच त्याचा परिणाम दिसणार नाही. चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम राहिला तर त्याचा परिणाम उत्पादननिर्मितीवर होऊ शकतो. 
-अनंत सरदेशमुख, माजी महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज

चीनमधून वर्षाला  होणारी आयात 
१० अब्ज डॉलर - ऑटोमोबाइल आणि  मशिनरीचे सुटे भाग
१६ अब्ज डॉलर -  सोलर, मोबाईल, अन्य सुटे भाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com