ममतादीदींचा मराठी माणसावर विश्वास; कामगारांची जबाबदारी पुणेकर अधिकाऱ्याकडे

टीम ई-सकाळ
सोमवार, 25 मे 2020

देशाच्या वेगवेगळ्या राज्यात बंगाली मजूर, कामगार अडकले असले तरी त्यांच्या सर्वाधिक संख्या महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये आहे.

पुणे : देशभर विखुरलेल्या बंगालींजणांना सुखरूपपणे त्यांच्या गावी परत आणण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी प्रशासन झटत असून, सर्वाधिक कामगार महाराष्ट्रातून पश्चिम बंगालमध्ये परतत आहेत. त्यासाठी ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकरही सक्रीय झाल्या आहेत. सुमारे एक लाख मजूर, कामगार परतीच्या वाटेवर असून, त्यासाठी राज्यातून 40 रेल्वेगाड्या सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

आणखी वाचा - शाळांचा निर्णय ठरला; शिक्षण आयुक्तांचा मोठा खुलासा

देशाच्या वेगवेगळ्या राज्यात बंगाली मजूर, कामगार अडकले असले तरी त्यांच्या  सर्वाधिक संख्या महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये आहे. सोन्याचे दागिने घडविणाऱ्या कारागीरांची मोठी संख्या हे पश्चिम बंगालचे वैशिष्ट आहे. लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेल्या या राज्यातील भौगोलिक परिस्थितीमुळे येथील मजूर, कामगार वर्ग देशभर पोचला असून त्या-त्या शहरांतील अर्थव्यवस्थेला गती देण्याची भूमिका पार पाडत आहे. मिल कामगार, प्लंबर, बांधकाम मजूर, गवंडी आदींचाही त्यात समावेश आहे.

Image may contain: 1 person, close-up

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नांदेड आदी जिल्ह्यांत त्यांची संख्या मोठी आहे. या बंगालींना परत त्यांच्या गावी पोचविण्यासाठी पर्यावरणवादी कार्यकर्त्या पाटकर यांनीही बंगाल सरकारशी संपर्क साधला आहे. तेथील राज्य सरकारने यासाठी मूळचे पुणेकर असलेले व 1989च्या आयएएस बॅचचे अधिकारी संजय थाडे यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. थाडे हे तेथे सध्या प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत. महाराष्ट्रातून परतणाऱ्या कामगारांना सुखरूप आणायची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

आणखी वाचा - राज्यात 54 दिवसांत चौपट कोरोना पेशंट

थाडे हे पुण्यातील गोखलेनगरचे रहिवासी आणि फर्ग्युसन, मॉडर्न महाविद्यालयाचे विद्यार्थी. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच बंगालमधील कामगारांचा परतीचा प्रवास सुखकर होत आहे. कोलकत्त्यामध्ये 1600 पॉझिटिव्ह रुग्ण असून आत्तापर्यंत 129 मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्राच्या तुलनेत कोरोना बंगालमध्ये शांत आहे. परंतु, परतणाऱ्या मजुरांमुळे कोरोना पसरू नये, यासाठी आता तेथे राज्य सरकारची यंत्रणा विशेष खबरदारी घेत आहे, असे थाडे यांनी कोलकत्ताहून सकाळशी बोलताना सांगितले.

आणखी वाचा - दहावी, बारावीच्या परीक्षा होणार; वाचा महत्त्वाची बातमी

राज्यातून आत्तापर्यंत 5 रेल्वेगाड्या बंगालकडे रवाना झाल्या असून, पुढच्या 15 दिवसांत 25 गाड्या सुटणार आहेत. त्यातून सुमारे 80 हजार मजूर परतणार आहेत तर, रस्त्यानेही प्रवास करीत सुमारे 20 हजार कामगार परतीच्या वाटेवर आहेत. राज्यात परणाऱ्या प्रत्येक मजूर, कारागीराचा स्वॅब घेऊन त्याची तपासणी करण्याची व्यवस्था पश्चिम बंगाल सरकारने प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्याच्या ठिकाणी केली आहे. परतणाऱ्या मजुरांना रेल्वेतून त्या-त्या जिल्ह्याच्या ठिकाणी उतरविले जाते आणि तेथे त्यांची तपासणी होते. महाराष्ट्रातून रवाना ङोणाऱ या मजुरांना तीन लिटर पाण्याची बाटली आणि खाद्यपदार्थ दिले जातात आणि तेथे उतरल्यावर पश्चिम बंगाल सरकारही त्यांची गावापर्यंत पोचेपर्यंत पुरेशी काळजी घेते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus lockdown west bengal workers ias sanjay thade