नगरसेविकांना लाचेचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

जुन्नर - शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामास मुदतवाढ मिळावी, यासाठी उपठेकेदाराकडून दोन नगरसेविकांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला. 

दरम्यान, लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपठेकेदाराच्या अमित शहा नावाच्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यास गटनेते जमीर कागदी यांना सांगितल्याचे आमदार शरद सोनवणे यांनी आज सांगितले. 

जुन्नर - शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामास मुदतवाढ मिळावी, यासाठी उपठेकेदाराकडून दोन नगरसेविकांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला. 

दरम्यान, लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपठेकेदाराच्या अमित शहा नावाच्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यास गटनेते जमीर कागदी यांना सांगितल्याचे आमदार शरद सोनवणे यांनी आज सांगितले. 

आमदार सोनवणे यांच्या ‘आपला माणूस आपली आघाडी’ पक्षाच्या नगरसेविका सना मन्सुरी व हाजरा इनामदार यांना जुन्नरच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामास मुदतवाढ मिळावी, यासाठी उपठेकेदारांच्या माणसाकडून ही रक्कम ता. २ एप्रिल रोजी त्यांच्या घरी जाऊन देण्यात आली. आघाडीचे गटनेते कागदी यांनी आमदारांना हा प्रकार सांगितला. त्या विषयी मूळ ठेकेदाराकडे चौकशी केल्यानंतर पैसे देणाऱ्या अमित शहा नावाच्या व्यक्तीचा व आपला संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘या संपूर्ण योजनेत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला असून, ९-१० वर्षे होऊनही योजना अपूर्ण राहिली आहे. चुकीच्या पद्धतीने कामे केली, यामुळे नागरिकांना पुरेशा दाबाने पूर्णवेळ शुद्ध व स्वच्छ पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. या प्रकारामागे योजनेतील कोट्यवधी रकमेचा गैरव्यवहार उघडकीस येऊ नये, यासाठी काही राजकीय शक्ती काम करीत असल्याचा संशय असल्याने दिलेली रक्कम पोलिसांकडे जमा करून संबंधितांविरोधात जुन्नर पोलिसांकडे तक्रार देण्यास सांगितले. या सर्व प्रकारची वरिष्ठ पातळीवरून स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, यासाठी पालकमंत्री गिरीश बापट व पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांच्याकडे मागणी करणार आहे,’’ असे सोनवणे यांनी सांगितले. 

या वेळी गटनेते जमीर कागदी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कविता गुंजाळ, नगरसेविका सना मन्सुरी, हाजरा इनामदार उपस्थित होत्या.

‘हात जोडले; तरी पैसे ठेवले’
नगरसेविका मन्सुरी व इनामदार म्हणाल्या, ‘‘पैसे घेऊन घरी आलेल्या अमित शहा नावाच्या व्यक्तीस पैसे नकोत, असे सांगून आम्ही हात जोडले. विनंती केली. पण, पाणी योजनेच्या कामास मुदतवाढ द्या, तुमचे बहुमत आहे, चिटणीससाहेबांनी यासाठी तुम्हाला हे बक्षीस दिले आहे, असे म्हणून तो पैसे ठेवून, मोजून घ्या, असे सांगून निघून गेला. या प्रसंगाने आम्ही भांबावून गेलो. आम्ही नगरपालिकेत नवीन असल्याने हा प्रकार गटनेते कागदी यांच्या कानावर घातला.’’ 

सुमारे नऊ कोटी ३८ लाख रुपये खर्चाच्या कामापोटी ठेकेदारास प्रत्यक्ष जादा रक्कम देण्यात आली आहे. अपूर्ण व चुकीच्या कामामुळे ठेकेदारास काळ्या यादीत घालण्याची मागणी केली होती. आत्तापर्यंत चार ते पाच वेळा मुदतवाढ दिली. या प्रकारामागे अन्य राजकीय व्यक्ती असाव्यात. आम्ही याचा पाठपुरावा करणार असून, आमदार शरद सोनावणे यांच्या सूचनेनुसार आज तक्रार देणार आहोत. 
- जमीर कागदी, गटनेते आपला माणूस, आपली आघाडी

Web Title: corporator bribe crime