#CivicIssues नगरसेवकांचा "उद्योग' अजूनही सुरू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पुणे - बेकायदा अतिक्रमणे हटविणाऱ्या पथकांतील कर्मचाऱ्यांना हटकण्याचा नगरसेवकांचा उद्योग अजूनही सुरूच असल्याचे मंगळवारी पुन्हा आढळून आले. अतिक्रमणविरोधी मोहिमेच्या केंद्रीय पथकातील निरीक्षकांवर दबाव आणत काही नगरसेवकांनी कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र कठोर भूमिका घेत स्टॉल आणि हातगाड्या ताब्यात घेतल्या. दुसरीकडे मात्र अतिक्रमणांना सरसकट नगरसेवक कारणीभूत नसल्याचा दाखला देत, ज्या भागातील नगरसेवक हस्तक्षेप करतात, त्यांची नावे जाहीर करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी "सकाळ'कडे केली. त्यामुळे मोहिमेत अडथळे येणार नाहीत, अशी त्यांची अपेक्षा आहे. 

शहरभरातील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असला, तरी आपल्या प्रभागातील व्यावसायिकांना त्रास होणार नाही, यासाठी नगरसेवक प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकारणी व्यक्तींकडे दुर्लक्ष करून बेकायदा हातगाड्या, स्टॉल आणि पथारी उचलणाऱ्या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत धमकाविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कारवाईला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारच्या राजकीय हस्तक्षेपामुळे अतिक्रमणे वाढत असल्याचे चित्र आहे. 

विविध भागांतील रस्ते आणि चौकांमधील बेकायदा हातगाड्या आणि स्टॉलवर कारवाईसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मंगळवारी नगरसेवक आणि व्यावसायिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. विशेषतः नगर रस्ता परिसरात अशा घटना घडल्याचे सांगण्यात आले. त्या वेळी नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांना फोन करून व्यावसायिकांचे साहित्य सोडण्याची मागणी केली. तरीही, आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे. 

भाजपच्या नगरसेविका मंजूश्री खर्डेकर म्हणाल्या, ""नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते मोकळे असले  पाहिजेत. त्यासाठी अतिक्रमणे काढण्याचा आग्रह असतो. कारवाईत कधी अडथळे आणत नाही. जे नगरसेवक हस्तक्षेप करतात, त्यांची नावे प्रसिद्ध करावीत.'' 

बेकायदा व्यावसायिकांकडून चिरीमिरी 
आपापल्या भागातील बेकायदा व्यावसायिकांना पाठीशी घालण्याच्या नावाखाली काही नगरसेवकांचे कार्यकर्ते पैशांची वसुली करीत असल्याच्या तक्रारी आहेत. काही भागांत रोज मोठ्या प्रमाणात वसुली होत असल्याने कारवाईला प्रचंड विरोध होत आहे. प्रसंगी कर्मचाऱ्यांना धमकाविण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल जात आहे. अशा घटनांमधील नगरसेवकांची नावे जाहीर करावी, ज्यामुळे खरी वस्तुस्थिती पुढे येईल, अशी अपेक्षा "सकाळ'च्या वाचकांनी व्यक्त केली.

Web Title: corporator Interference in Encroachment Removal Campaign