लांडगे यांचा आयुक्तांकडे राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016

पिंपरी - नगरसेवकपदाचा राजीनामा गुरुवारी आयुक्‍त दिनेश वाघमारे यांच्याकडे सादर करताना आमदार महेश लांडगे. या वेळी विजय फुगे, बाळासाहेब गव्हाणे.

पिंपरी - अपेक्षेप्रमाणे भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी आज सायंकाळी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांना सादर केला. आयुक्तांनी तो स्वीकारला असून, पुढील कार्यवाहीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. या वेळी विजय फुगे, बाळासाहेब गव्हाणे यांच्यासह त्यांचे अनेक समर्थक उपस्थित होते. 

आमदार लांडगे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. त्याला उद्या पूर्णविराम मिळणार आहे. प्रवेशाच्या तयारीचा एक भाग म्हणून लांडगे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत लांडगे राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले होते. माजी आमदार विलास लांडे यांचे ते जवळचे नातेवाईक आहेत; परंतु विधानसभा निवडणूक लढविण्यावरून दोघांमध्ये राजकीय दुरावा निर्माण झाला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत लांडगे अपक्ष म्हणून उभे राहिले आणि त्यांनी लांडे यांचा पराभव केला. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि मनसे अशा पाच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा त्यांनी पराभव केल्याने त्यांचा विजय राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. 

तेव्हापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्यावर नजर होती; पण राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी जुळवून घेत लांडगे यांनी महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. पदाची मुदत संपताच त्यांनी हळूहळू मुख्यमंत्र्यांशी व भाजप नेत्यांशी जवळीक साधून भाजप प्रवेश नक्की केला. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

चाळीस नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी

आमदार महेश लांडगे यांचा भाजप प्रवेश शुक्रवारी (ता. १४) होत असताना त्यांच्यासमवेत ३४ प्रमुख कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यात १४ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. याशिवाय २७ नोव्हेंबरला भोसरीत होणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात २० विद्यमान नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील. या मेळाव्यास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आमदार लांडगे यांना भाजपमध्ये प्रवेश देताना मुख्यमंत्र्यांनी ४० नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे; मात्र, लांडगे यांनी किमान २५ नगरसेवक निवडून आणू, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांना दिल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: corporator mahesh landage resign to commissioner