सोमवारपासून कॉसमॉस एटीएम सेवा पूर्ववत - मिलिंद काळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पुणे - कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम पेमेंट स्विचवर आंतरराष्ट्रीय हॅकर्सकडून मालवेयर हल्ला करून एटीएम आणि ऑनलाइनद्वारे भारतासह 29 देशांमध्ये सुमारे 94 कोटी 45 लाखांची लूट केल्याच्या घटनेमुळे बॅंकिंग क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. त्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून एटीएम, मोबाईल आणि इंटरनेट बॅंकिंग सुविधा काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कॉसमॉस बॅंकेकडून घेण्यात आला होता. येत्या सोमवार (ता. 20)पासून ही सेवा पूर्ववत होईल असे संकेत कॉसमॉस बॅंकेकडून देण्यात आले आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व्हरवर सायबर हल्ला केल्यानंतर कॉसमॉस बॅंकेच्या एटीएम, पॉइंट ऑफ सेल, ई कॉम, मोबाईल आणि इंटरनेट बॅंकिंग सेवा रविवारपासून (ता. 12) बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या संदर्भात खातेदारांना मोबाईल मेसेजद्वारे देखील कळविले. दरम्यान, 112 वर्षांची परंपरा असलेल्या कॉसमॉस बॅंकेच्या सात राज्यांमध्ये 140 शाखा आहेत. एकूण 20 लाखांहून जास्त खातेदार असून 20 हजार कोटींहून जास्त व्यवहार आहे. बॅंकेची आर्थिक सद्यःस्थिती भक्कम आहे. बॅंकेचा एकूण निधी (रिझर्व्ह) 1 हजार 646 कोटी 27 लाख रुपये, तर भांडवल 352 कोटी 47 लाख असा एकूण 1 हजार 998 कोटी 74 लाख स्वनिधी (नेटवर्थ) असल्याची माहिती बॅंकेकडून अधिकृतरीत्या देण्यात आली.

या संदर्भात कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे म्हणाले, ""बॅंकेच्या सर्व्हरवरील एटीएम स्विचवरील हल्ला हा आंतरराष्ट्रीय हल्ला असून, बॅंकिंग क्षेत्रासाठी ही चिंतेची बाब आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एटीएम, मोबाईल आणि इंटरनेट बॅंकिंग सेवा बंद ठेवली असली, तरी सर्व खातेदारांच्या सोईसाठी बॅंकेच्या सर्व 140 शाखांमधील व्यवहार सुरळीत सुरू आहेत. रोख रक्कम, आरटीजीएस सिस्टिम, धनादेश व धनाकर्षाचे सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. येत्या सोमवारपासून (ता. 20) एटीएम, पॉइंट ऑफ सेल, ई कॉम, मोबाईल आणि इंटरनेट बॅंकिंग सेवा पूर्वपदावर येईल,'' असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

सायबर मालवेयर हल्ला हा बॅंकेच्या कोअर बॅंकिंग सिस्टिम (सीबीएस), जी इन्फोसिस कंपनीद्वारे नियंत्रित केली जाते, त्यावर झालेला नाही, तर डेबिट कार्ड सर्व्हर जो स्विस कंपनीचा आहे, त्यावर झालेला आहे. स्विफ्ट सर्व्हर हा स्विफ्ट या कंपनीकडून घेतलेला आहे. त्यावर हा हल्ला झाल्यामुळे कोणत्याही खातेदाराच्या खात्यातून रक्कम काढली गेलेली नाही. याप्रकरणी खातेदारांना कोणतीही झळ पोचणार नाही. कायदेशीर बाबी तपासून संबंधित रक्कम कशी वसूल केली जाईल याबाबत कायदेतज्ज्ञांची मदत घेतली जात असल्याचे देखील बॅंकेकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Cosmos Bank ATM Service Milind Kale