परदेशी वळविलेल्या पैशांची माहिती व्हिसा कंपनीकडून मागविणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे - कॉसमॉस बॅंकेच्या ऑनलाइन दरोड्याबाबत विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सध्या एटीएम, सीसीटीव्ही व मोबाईल टॉवर या तिन्ही घटकांच्या आधारे तपास केला जात आहे. याबरोबरच परदेशात वळविलेल्या पैशांच्या व्यवहाराची माहितीही व्हिसा कंपनीकडून विशेष पथकाने मागविली आहे. 

पुणे - कॉसमॉस बॅंकेच्या ऑनलाइन दरोड्याबाबत विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सध्या एटीएम, सीसीटीव्ही व मोबाईल टॉवर या तिन्ही घटकांच्या आधारे तपास केला जात आहे. याबरोबरच परदेशात वळविलेल्या पैशांच्या व्यवहाराची माहितीही व्हिसा कंपनीकडून विशेष पथकाने मागविली आहे. 

कॉसमॉस बॅंकेच्या मुख्यालयातील एटीएम स्वीचवर (सर्व्हर) सायबर हल्ला चढवून हॅकर्सनी तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये इतकी रक्कम तीन दिवसांत काढून घेतली. या प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी "एसआयटी'ची स्थापना केली होती. त्यानंतर एसआयटीने तपासाला सुरवात केली. महाराष्ट्रात मुंबई, कोल्हापूर, पुणे आणि मध्य प्रदेशातील इंदूर या शहरांमधील एटीएममधून पैसे काढल्याचे उघड झाल्यानंतर पथकाने त्यावर लक्ष केंद्रित केले होते. 

कॉसमॉस बॅंकेकडून तपास पथकाला आत्तापर्यंत 50 टक्के सांख्यिकी माहिती (डेटा) मिळाली असल्याची माहिती "एसआयटी'च्या प्रमुख व आर्थिक, सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह यांनी दिली. पोलिसांकडून एटीएमची ठिकाणे, मोबाईल टॉवरची ठिकाणे व सीसीटीव्ही चित्रीकरण या तिन्ही घटकांमधील माहिती गोळा करून त्यांचा ताळमेळ घातला जाणार आहे. त्यातून तपासाला मदत होण्याची शक्‍यता सिंह यांनी व्यक्त केली. 

कॉसमॉस बॅंकेकडून सध्या "सिक्‍युरीटी ऑडिट' केले जात आहे. त्यानुसार पोलिसही "सिक्‍युरीटी ऑडिट' करणार आहेत. परदेशामध्ये व्हिसाद्वारे, भारतामध्ये रुपेद्वारे व्यवहार झालेला आहे. त्यामुळे पोलिस व्हिसाकडूनही माहिती मागविणार असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Cosmos Bank Case Visa company will ask for information on foreign-made money