हॅकिंग करताना ग्राहकांच्या खात्यावर पैसे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पुणे  - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यापैकी काही जणांनी हकिंग सुरू असतानाच पैसे काढल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. यातील दोन ग्राहकांकडून पोलिसांनी एक लाख दहा हजार रुपये हस्तगत केले आहेत. 

पुणे  - कॉसमॉस बॅंकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या ऑनलाइन दरोड्याच्या वेळी (हॅकिंग) बॅंकेच्याच काही ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यापैकी काही जणांनी हकिंग सुरू असतानाच पैसे काढल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. यातील दोन ग्राहकांकडून पोलिसांनी एक लाख दहा हजार रुपये हस्तगत केले आहेत. 

कॉसमॉस बॅंकेच्या गणेशखिंड येथील मुख्यालयातील एटीएम सर्व्हर हॅक करून हॅकर्सनी 11 ते 13 ऑगस्ट या तीन दिवसांत 94 कोटी 42 लाख रुपये गायब केले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. या पथकाने पुणे, कोल्हापूर, मुंबई व इंदौर या शहरांमधील ज्या एटीएममधून पैसे काढले गेले, त्यावर लक्ष केंद्रित केले. 

दरम्यान, पोलिसांनी बॅंकेच्या काही ग्राहकांच्या खात्याची तपासणी केली असता 11 ते 13 ऑगस्ट या कालावधीत काही जणांनी सातत्याने एटीएममधून पैसे काढल्याचे आढळले. त्यानुसार पथकातील सायबर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे व पोलिस निरीक्षक राधिका फडके यांना तपासादरम्यान हा प्रकार निदर्शनास आला. 

पोलिसांनी बॅंकेच्या काही ग्राहकांशी संपर्क साधून त्यांच्या खात्यामध्ये जादा पैसे जमा झाल्याबाबत विचारणा केली. त्या वेळी दोन जणांनी आपल्या खात्यामध्ये अचानक जादा पैसे जमा झाल्याचे सांगितले. तसेच हव्यासापोटी आपण पैसे काढल्याची कबुलीही दिली. हॅकिंग वेळी पुण्यातील बॅंकेच्या एका ग्राहकाच्या खात्यात 90 हजार, तर एकाच्या खात्यात 20 हजार रुपये आले होते. दोघांकडूनही पैसे परत मिळविले असल्याची माहिती पायगुडे यांनी दिली. 

171 जणांच्या खात्यात पैसे  
हॅकर्सकडून हॅकिंग सुरू असताना कॉसमॉस बॅंकेचे ग्राहक असलेल्या 171 जणांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्याचवेळी एटीएममधून पैसे काढणाऱ्या काही जणांना आपल्या खात्यात अचानक पैसे जमा झाल्याचे आढळले. त्यांनी बॅंकेला किंवा पोलिसांना न कळविता पैसे काढल्याचे फडके यांनी सांगितले. 

पैसे खात्यात जमा झालेले एटीएम कार्डधारक 
- देशातील एटीएम कार्डधारक ः 428 
- पुण्यातील एटीएम कार्डधारक ः 171 
- पुण्यात झालेले एटीएम व्यवहार ः 1500 
- परत मिळालेली रक्कम ः 1 लाख 10 हजार 

Web Title: Cosmos Online Bank robbery case Money on customer's account while hacking