रस्तेखोदाईसाठी झालेला खर्च योग्यच ; महापालिकेचा दावा

रस्तेखोदाईसाठी झालेला खर्च योग्यच ; महापालिकेचा दावा

पुणे : राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार आणि नियमानुसारच सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते वडगावदरम्यानच्या नदीकाठच्या रस्त्याचे खोदाईचे काम पूर्ण करण्यात येत आहे. त्यासाठी कोणतीही जादा रक्कम ठेकेदाराला अदा करण्यात आलेली नाही, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला. 

सिंहगड रस्त्यावरील नदीकाठच्या रस्त्याची रुंदी 24 मीटर असताना महापालिकेकडून तो तीस मीटरचा दाखवून खोदाई करण्यात आली. त्या कामापोटी ठेकेदारालाही चार कोटी रुपये अदा करण्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावर महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी हा दावा केला. 

पावसकर म्हणाले, "नदीकाठचा हा रस्ता ब्लू लाइनमध्ये येत असल्याने तो रस्ता खोदून काढावा; तसेच त्या ठिकाणी असलेला राडारोडादेखील काढून टाकावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने निविदा मागवून हे काम सुरू केले आहे. या कामाची अंदाजपत्रकामध्ये 30 मीटर रस्ता विकसित करणे, असा उल्लेख असून त्यासाठीची तरतूद होती. त्यानुसार निविदा काढण्यात आली; तसेच या रस्त्याची जागेवरील रुंदी 24 मीटर असली तरी रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी टाकलेला भराव जास्त रुंदीचा होता. त्या लगत मोठ्या प्रमाणावर राडारोडा होता. रस्ता उखडण्याचे काम सुरू असताना वेळोवेळी याचिकाकर्ते सारंग यादवाडकर यांच्याबरोबरच काम नियमानुसार सुरू आहे की नाही, यांची पाहणीदेखील करण्यात येत होती. त्यांनीदेखील या संदर्भात न्यायालयात वाढीव काम किंवा कोणत्याही संदर्भातील आक्षेप नोंदविलेला नाही; तसेच काम सुरू होण्यापूर्वी व झालेल्या कामाचे चित्रीकरण, फोटो आणि आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे वेळोवेळी न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.'' 

तसेच हा रस्ता एकूण 1350 मीटर (1.35 किलोमीटर) लांबीचा रस्ता आहे. कामाचे पूर्वगणनपत्रक 3 कोटी 37 लाख रुपयांचे आहे. निविदा रक्कम 2 कोटी 69 लाख रुपयांची आहे. आजपर्यंत रस्त्याचे खोदाईचे काम अंदाजे 950 मीटर झाले आहे. त्यापोटी ठेकेदाराला आतापर्यंत दीड कोटी रुपयांचे बिल आदा करण्यात आल्याने ठेकेदाराला कोणतेही जादा बिल देण्यात आलेले नाही, असेही पावसकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com