योजनेचा खर्च दोनशे कोटींनी वाढणार 

योजनेचा खर्च दोनशे कोटींनी वाढणार 

पुणे - समान पाणीपुरवठा योजनेची खोदाई काही नगरसेवकांनी पैशांच्या हव्यासापायी रोखल्याने योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. त्याचा परिणाम योजनेच्या खर्चावर होणार असून, तो दोनशे कोटी रुपयांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्याशिवाय या योजनेतून पुणेकरांना समान व शुद्ध पाणी मिळण्यासाठी आणखी चार वर्षे वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पावसाळ्यात रस्तेखोदाईला परवानगी नसल्याने खोदाईची कामे पूर्णपणे थांबणार आहेत. 

जलवाहिन्यांच्या कामात अडचणी असल्याचे वृत्त "सकाळ'ने गुरुवारी प्रसिद्ध केले. त्यापाठोपाठ या योजनेतील पाण्याच्या टाक्‍यांचीही कामे रखडण्याची भीती महापालिका प्रशासनाला आहे. योजनेतील 95 पैकी 12 टाक्‍यांच्या जागेचा वाद हा न्यायालयात आहे. त्यामुळे पुढील महिनाअखेरपर्यंत टाक्‍यांचेही उद्दिष्ट गाठता येणार नसल्याचे सांगण्यात आले. 

संपूर्ण शहरासाठी आखलेल्या या योजनेतील विविध कामे 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यात योजनेतील 1600 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांसह साठवण टाक्‍या, मीटर ही प्रमुख कामे करण्यात येणार आहेत. चार महिन्यांपूर्वी म्हणजे जानेवारीत 1600 पैकी 125 किलोमीटरच्या जलवाहिन्यांच्या खोदाईला सुरवात करण्यात आली होती. परंतु, आपापल्या भागातील खोदाईसाठी नगरसेवकांनी संबंधित ठेकेदाराकडे पैशांची मागणी करीत खोदाई रोखली आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत खोदाईचे जेमतेम दीड टक्के इतकेच काम झाले आहे. नगरसेवक ऐकत नसल्याने ठेकेदारानेही खोदाई थांबवली आहे. त्यामुळे 2300 कोटी रुपयांच्या योजनेचा खर्च अडीच हजार कोटी रुपये होण्याची शक्‍यता आहे. 

महापालिका आयुक्त सौरभ राव म्हणाले, ""योजनेतील कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यात अडचणी येणार नाहीत, याकडे लक्ष देण्यात येईल. बहुतांश टाक्‍यांची कामे जूनपर्यंत होतील.'' 

ठेकेदारही जबाबदार 
या योजनेचा खेळखंडोबा करण्यात नगरसेवकांसह ठेकेदारही जबाबदार असल्याच्या तक्रारी आहेत. कामाबाबत तक्रार करू नये म्हणून ठेकेदाराने पहिल्याच चर्चेत 18 ते 20 लाख रुपये देण्याची तयारी दाखविल्याचे पुणे-सातारा रस्त्यावरील एका नगरसेवकाने सांगितले. पैसे नको असतील, तर कामासाठी साहित्य पुरविण्याची "ऑफर'ही ठेकेदाराने नगरसेवकाला दिली होती, असेही सांगण्यात आले आहे. योजनेच्या अंमलबजावणीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने हा गोंधळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com