समुपदेशनाने निघतोय कौटुंबिक वादावर तोडगा

Family-Dispute
Family-Dispute

पुणे - आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुण आणि तरुणीचे लग्न जुळले. परंतु, काही दिवसांनी किरकोळ कारणामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये वाद होऊन लग्न तुटण्याची वेळ आली. यातून मार्ग काढण्यासाठी तरुणीने पोलिसांच्या महिला सहायता कक्षाशी संपर्क साधला. पोलिसांनी दोन्ही कुटुंबप्रमुखांची समजूत काढली आणि लग्न ठरल्याप्रमाणे पार पडले. अशा पद्धतीच्या विविध कौटुंबिक तक्रारी सोडविण्याचे काम महिला सहायता कक्ष करीत आहे. मागील अडीच वर्षांत साडेसहा हजारांहून अधिक अर्ज कक्षाकडे आले असून, त्यातील निम्म्या प्रकरणांमध्ये समुपदेशनाद्वारे समझोता घडविण्यात आला.

महिलांना भेडसावणारे कौटुंबिक प्रश्‍न, त्यांना दैनंदिन काम करताना येणाऱ्या अडचणी आणि इतर प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी पुणे पोलिसांनी महिला सहायता कक्षाची काही वर्षांपूर्वी स्थापना केली. त्याद्वारे महिलांचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य दिले जात होते. पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी महिला सहायता कक्षास ‘भरोसा सेल’अंतर्गत एकाच छताखाली आणून महिला, वृद्ध व बालकांच्या समस्या सोडविण्याचे काम केले. मागील दोन-तीन वर्षांमध्ये या विभागाकडे येणाऱ्या तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

यंदा जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत १ हजार ३३६ इतके अर्ज महिला सहायता कक्षाकडे आले. त्यापैकी ३७५ तक्रारी पोलिस अधिकारी, समुपदेशक व पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सोडविण्यास प्राधान्य देण्यात आले. महिला सहायता कक्षाकडे येणारे बहुतांश अर्ज कौटुंबिक स्वरूपाच्या तक्रारींचे असतात. या तक्रारी सोडविताना तक्रारदार आणि विरुद्ध व्यक्ती या दोघांनाही समोरासमोर बसवून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. अनेकदा पाच ते सहा वेळा त्यांच्याबरोबर चर्चा होते. त्यानंतर त्यांच्यात समझोता घडविला जातो.

तक्रारींचे स्वरूप
      पती-पत्नीमधील किरकोळ वाद 
      सासू-सून, सासरे व नणदेकडून होणारा त्रास
      एकत्र कुटुंबाऐवजी विभक्त राहण्यासाठीचा अट्टहास
      पैसा, मालमत्ता, वाहनांमुळे होणारी भांडणे
      विवाहबाह्य संबंध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com