सिग्नलच्या टायमरचेच काउंटडाउन 

pune singal
pune singal

पुणे - सिग्नलचा वेळ 90 सेकंदांचा.... काउंटडाउन टायमरकडे बघून वाहनचालक वाहन बंद करतो. 10 सेकंद राहिलेले असताना ते पुन्हा सुरू करतो अन्‌ हिरवा दिवा लागल्यावर पुढे निघतो.... असे या पूर्वी सर्रास दिसणारे दृश्‍य आता हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्‍याच चौकात दिसत आहे. कारण अनेक चौकांतील वाहतूक नियंत्रक दिव्यांवरील काउंटडाउन टायमरचेच आता काउंटडाउन सुरू आहे. परिणामी, प्रदूषण नियंत्रण आणि इंधनबचतीचा उद्देशही हरवत आहे. दरम्यान, किमान वर्दळीच्या चौकात तरी सिग्नलला टायमर प्राधान्याने बसवावेत, अशी मागणी वाहतूक पोलिसांनी महापालिकेकडे केली आहे. 

शहरातील अनेक चौकांमध्ये वाहतूक नियंत्रक दिव्यांवर महापालिकेने 1998-99 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर तर 2006-07 मध्ये बहुसंख्य चौकांत काउंटडाउन टायमर बसविले होते. सिग्नलची वेळ 70-90 सेकंदांची असेल तर, वाहनचालकांना वाहन बंद करता येईल आणि सिग्नलची वेळ संपत आली की वाहन सुरू करता येईल. त्यातून प्रदूषण कमी होईल आणि इंधनाचीही बचत होईल, असा या मागे उद्देश होता. 
मधल्या काळात बहुसंख्य चौकांत काउंटडाउन टायमर सुरू होते. परंतु, आता त्यांची संख्या कमी होत आहे. तसेच नवे सिग्नल उभारले जात असले तरी त्यावर काउंटडाउन टायमर बसविले जात नाहीत. हे काउंटडाउन टायमर बसविले तर उपयुक्त ठरतील, असे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. 

वाहतूक पोलिसांनी सुचविल्यानुसार टायमर बसविले जातात. परंतु, या बाबतच्या धोरणात सातत्य नाही. या पूर्वीच्या काही उपायुक्तांनी टायमरची उपयुक्तता नसल्याचे सांगितले होते. सध्याच्या उपायुक्तांनी सूचना केली तर त्यानुसार कार्यवाही केली जाईल. 
रामदास तारू, अधीक्षक अभियंता, विद्युत विभाग, महापालिका 

सरसकट चौकात असे टायमर बसविण्याची गरज नाही. शहरातील वर्दळीच्या चौकांची संख्या वाढत आहे. तसेच सिग्नलची वेळही वाढत आहे. त्या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. टायमरमुळे सिग्नलची वेळ संपत आल्याचे लक्षात आल्यावर वाहनचालक तयारीत राहतात. काही चौकांत वाहनचालक वाहन बंद करून उभे राहतात. हिरवा दिवा लागल्यावर ते वाहन सुरू करतात. त्यातही अनेकदा वेळ जातो. त्यामुळे प्रमुख चौकांत टायमरची गरज आहे. 
अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा 

यांच्या मते...  
अनेक चौकात काउंटडाउन टायमरची आवश्‍यकता आहे. सिग्नलची वेळ जास्त असेल तर, वाहन बंद करता येते तसेच सिग्नलजवळ वाहनाच्या वेगावरही नियंत्रण येते. 
- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच 

टायमर हा पादचाऱ्यांसाठीही उपयुक्त आहे. तसेच वाहतुकीच्या कोंडी सोडविण्यासाठीही तो उपयुक्त ठरू शकतो. 
- राजेश शेंडे, लॉ कॉलेज रोड रहिवासी संघ 

टायमरचा अनेकदा दुरुपयोग होतो. शेवटच्या पाच-सात सेकंदांच्या वेळी काही वाहनचालक भरधाव जातात. त्यातून अपघात होऊ शकतात. त्यामुळे याबाबत वाहनचालकांत जागरूकता निर्माण करून निर्णय घ्यायला हवा. 
- राजेंद्र सिधये, सेव्ह पुणे ट्रॅफीक मुव्हमेंट 

टायमर 80 सेकंदांपेक्षा जास्त वेळेचा असेल तर मी माझी दुचाकी बंद करते. शेवटच्या पाच सेकंदांत ती सुरू करते. त्यामुळे सुमारे 75 सेकंदांच्या इंधनाची बचत होते अन्‌ त्यामुळे प्रदूषणही कमी होते, असे मला वाटते. हे टायमर प्रत्येक चौकात बसविणे गरजेचे आहे. 
- ऍड. अनुया कुलकर्णी, वाहनचालक 

शहरातील वाहतूक नियंत्रक दिवे - 215 
वर्दळीचे चौक - सुमारे 60 
काउंटडाउन टायमरची आवश्‍यकता - सुमारे 240 
सध्या काउंटडाउन टायमर असलेले चौक - सुमारे 100 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com