बॅंकांकडेच आढळताहेत बनावट नोटा

बॅंकांकडेच आढळताहेत बनावट नोटा

 
पुणे : पुणे शहर व जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील बॅंकांमध्ये पैसे भरण्याच्या बहाण्याने काही व्यक्तींकडून बनावट नोटांचा भरणा केला जात असल्याच्या घटना काही दिवसांपासून घडू लागल्या आहेत. बॅंकांना आढळणाऱ्या बनावट नोटांची संख्या कमी असली तरी, सावधगिरीचा उपाय म्हणून बॅंकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे बनावट नोटा पसरविणारी टोळी सक्रिय झाल्याची शक्‍यता लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या पोलिसांनीही त्यादृष्टीने शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 
बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शाखांकडून जमा होणाऱ्या रकमेमध्ये शंभर रुपयांच्या तीन बनावट नोटा बॅंकेला आढळल्या होत्या. याच पद्धतीने बॅंक ऑफ इंडियामध्येही शंभर रुपयांच्या 18, तर पन्नास रुपयांच्या पाच अशा बनावट नोटा "करन्सी चेस्ट मशिन'च्या तपासणीत आढळल्या होत्या. या दोन्ही बॅंकांनी याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बॅंकांकडे बनावट नोटा येण्याच्या घटना नवीन नाहीत. त्याविषयी तत्काळ रिझर्व्ह बॅंकेलाही कळविले जाते. पोलिसांकडे फिर्यादही दिली जाते. मात्र, बनावट नोटा कुठून व कशा येतात, याबाबतचा शोध घेण्याचे प्रयत्न होत नसल्याची सद्यःस्थिती आहे. 
पोलिसांनीही जप्त केल्या बनावट नोटा 
शहरामध्ये 200 रुपयांच्या बनावट नोटा तयार करून त्यांचे वितरण करणाऱ्या एका तरुणास गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने सहा महिन्यांपूर्वी अटक केली होती. संबंधित आरोपीने शहराच्या वेगवेगळ्या भागात सात ते आठ हजार रुपयांच्या बनावट नोटा वितरित केल्या होत्या. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने तीन महिन्यांपूर्वी समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत फलटणमधील एका तरुणास अटक केली होती. त्याच्याकडे 84 हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या होत्या. त्याचा साथीदार मात्र अद्यापही फरारी आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरामध्ये बनावट नोटा पसरविणारी, परराज्यातील टोळी सक्रिय झाल्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

शहराच्या वेगवेगळ्या शाखांमधून बॅंकांच्या दैनंदिन कामकाजावेळी बनावट नोटा बॅंकांकडे येतात. संबंधित नोटा "करन्सी चेस्ट मशिन'मध्ये तपासताना त्यातून बनावट नोटा बाजूला फेकल्या जातात. दर महिन्याला अशा बनावट नोटा आढळतात. त्याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून, रिझर्व्ह बॅंकेला रीतसर माहिती दिली जाते. 
- जे. ए. ठकार, करन्सी चेस्ट इन्चार्ज, बॅंक ऑफ महाराष्ट्र, बाजीराव रोड शाखा 

 
बॅंकांमध्ये बनावट नोटा सापडण्याचे गुन्हे पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. यापूर्वी पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन बनावट नोटा वितरित करणाऱ्यांना अटक केली आहे. बनावट नोटा पसरविणारी टोळी सक्रिय झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मात्र गोपनीय माहितीद्वारे त्यांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करू. 
- अशोक मोराळे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com