गुणवंत शिक्षकांमुळेच देश घडतो - माशेलकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

महाराष्ट्रीय मंडळानेच मला घडवले. मंडळाच्या शाळेत असतानाच कै. शिवरामकाकांच्या प्रेरणेने क्रीडा क्षेत्रात प्रवेश केला. चांगले आयुष्य आणि क्रीडा कौशल्य जपण्यासाठी शारीरिक स्वास्थ आणि ताकदीची गरज असते आणि ती खेळातून मिळते. त्यामुळे प्रत्येकाने खेळले पाहिजे.
- राम भागवत, ॲथलेटिक्‍स मार्गदर्शक

पुणे - आयुष्य घडवत असताना गुरूचे बळ असणे आवश्‍यक असते. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय पुढेच जाता येत नाही. गुणवंत शिक्षकांमुळे देश घडत असतो. ज्ञान, बुद्धी, व्यक्ती आणि मूल्य संवर्धनाचे कार्य शिक्षक करत असतो. त्यामुळे गुरूच्या कार्याचा सन्मान व्हायलाच हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी रविवारी येथे केले.

महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा कै. कॅ. शिवरामपंत दामले’ पुरस्कार आज माशेलकर यांच्या हस्ते ज्येष्ठ ॲथलेटिक्‍स मार्गदर्शक राम भागवत यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. माशेलकर म्हणाले, ‘‘शिक्षणातील बदल समजून घेणे आवश्‍यक आहे. यातील ज्ञान, बुद्धी हे बदलले आहेत; पण व्यक्ती संवर्धन आणि शरीर संवर्धन यात फरक पडलेला नाही.

त्यामुळे शारीरिक शिक्षण आणि आरोग्य संवर्धन चिरकालीन आहे. असे कार्य करणाऱ्या गुणी शिक्षकांचा सन्मान करण्याचे काम महाराष्ट्रीय मंडळ करत आहे. ही कौतुकाची बाब आहे आणि आज क्रीडा क्षेत्रातील अशाच राम भागवतांसारख्या  ज्येष्ठ गुरूंचा माझ्या हस्ते सन्मान होतोय, हा मी माझा सन्मान मानतो.’’ 

या वेळी जिम्नॅस्टिक खेळाडू रिया केळकर, महिला क्रिकेटपटू देविका वैद्य, क्रीडा पत्रकार विठ्ठल देवकाते, जनार्दन कोळी यांचाही गौरव करण्यात आला. या वेळी एअर मार्शल भूषण गोखले, ॲडव्होकेट नंदू फडके, महाराष्ट्रीय मंडळाचे सरकार्यवाह धनंजय दामले यांच्यासह अनेक मान्यवर आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The country is the develop of quality teachers raghunath Mashelkar