घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणाऱ्यांना चाप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतल्यानंतरही पहिल्या जोडीदारापासून कायदेशीर विभक्त न होता दुसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या 24 जणांना न्यायालयाने दणका दिला. गेल्या 3 वर्षांत दाखल झालेल्या खटल्यात तक्रारदारांना दिलासा देत कौटुंबिक न्यायालयाने दुसरे लग्न बेकायदेशीर ठरवत ते रद्दबातल केले. 

पुणे : आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतल्यानंतरही पहिल्या जोडीदारापासून कायदेशीर विभक्त न होता दुसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या 24 जणांना न्यायालयाने दणका दिला. गेल्या 3 वर्षांत दाखल झालेल्या खटल्यात तक्रारदारांना दिलासा देत कौटुंबिक न्यायालयाने दुसरे लग्न बेकायदेशीर ठरवत ते रद्दबातल केले. 

लग्न करताना त्यात कोणते विधी झाले पाहिजेत, तसेच त्यातील कोणत्या पारंपरिक बाबी पाळल्या पाहिजेत, याबाबत हिंदू विवाह कायद्यात काही अटी कलम 5 मध्ये नमूद केल्या आहेत. त्यानुसार पहिल्या लग्नाचा घटस्फोट झाल्याशिवाय दोघांनाही दुसरे लग्न करता येत नाही. मात्र पती-पत्नीत मतभेदानंतर त्यांच्यातील दुरावा वाढतो व ते कायमस्वरूपी विभक्त होण्याच्या निर्णयापर्यंत पोचतात. अपवादात्मक परिस्थिती वगळता घटस्फोटासाठी किमान 6 महिन्यांच्या कालावधी लागतो. पण दुसरे लग्न करण्यासाठी उतावीळ झालेली व्यक्ती घटस्फोटाची प्रक्रियादेखील पूर्ण न करता पुन्हा बोहल्यावर चढते. त्यातील दुसरे लग्न हे बऱ्याचदा लपून-छपून केले जाते. मात्र त्याची माहिती आधीच्या पती किंवा पत्नीला मिळाल्यावर त्यांचे बिंग फुटते. हा सर्व प्रकार घडल्यानंतर त्याने-तिने घटस्फोट न घेता केलेले दुसरे लग्न बेकायदेशीर ठरवून ते रद्दबातल करण्याची मागणी हिंदू विवाह कायद्याच्या कलम 12 नुसार करता येते. 

लग्न करीत असलेल्या व्यक्तींचे आधीच लग्न झालेले नसावे, लग्नाला दोघांची संमती असावी, दोघेही शारीरिकदृष्टा सुदृढ असावेत, ते वैवाहिक शारीरिक संबंध ठेवू शकतील, त्याबाबत त्यांच्यात काही शारीरिक उणिवा नसाव्यात. दोघांचे वय कायद्याप्रमाणे योग्य असावे आणि वधू आणि वरात मामा, काका, मावशीचा मुलगा, चुलत भाऊ असे नाते नसावे, अशा अटी कलमात आहेत. त्या पाळल्या गेल्या नसतील तर तक्रारदाराला न्यायालयात दाद मागता येते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालय त्यावर योग्य तो निकाल देते. लग्न करताना हिंदू विवाह कायद्यातील कलम पाचचे पालन करणे गरजेचे आहे, अशी माहिती ऍड. प्रगती पाटील यांनी दिली. 

दोन्ही साथीदार दुरावले

कौटुंबिक न्यायालयात नुकताच असा एक प्रकार निकाली लावला होता. घरच्यांच्या दबावाला बळी पडून तिने लग्न केले; मात्र तिचा जीव मित्रात अडकलेला. त्यामुळे काही दिवसांनी तिने मित्राबरोबर लग्न केले; परंतु आधीच्या पतीबरोबर घटस्फोट घेतला नव्हता.

काही महिने तिचे दोन्ही संसार सुरू होते. मात्र तिच्या पतीला पत्नीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळाली आणि बिंग फुटले. ही बाब पतीला कळल्यानंतर त्याने ताबडतोब पत्नीविरोधात अर्ज दाखल केला. हे प्रकरण न्यायालयात गेल्याने न्यायाधीशांनी दुसऱ्या लग्नाबाबत त्यांच्यासमोर आलेला पुरावा पाहून अर्जदाराचे संबंधित लग्न रद्दबातल ठरवून निकाल दिला. अशा प्रकाराने कायद्यातील तरतुदींचे पालन न केल्यामुळे पत्नीने फसवणूक केल्याचे सिद्ध झाले. 

वर्ष निकाली दावे 
2016 11 
2017 07 
2018 05 
2019 (जानेवारीअखेर) 01

Web Title: Court Decision for married couples who not separating

टॅग्स