आरोपीला जामीनासाठी एक लाख मुख्यमंत्री साहय्यता निधीत जमा करण्याचे न्यायालयाचे आदेश

मिलिंद संगई
Monday, 26 October 2020

डॉक्टरांवर होणा-या हल्ल्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयही आता संवेदनशील बनले आहे. बारामतीतील डॉक्टरांवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या संशयितास अटकपूर्व जामीन देताना मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक लाखांची रक्कम भरण्याचे निर्देश दिले आहेत.

बारामती : डॉक्टरांवर होणा-या हल्ल्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयही आता संवेदनशील बनले आहे. बारामतीतील डॉक्टरांवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या संशयितास अटकपूर्व जामीन देताना मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक लाखांची रक्कम भरण्याचे निर्देश देत, ही रक्कम जमा न केल्यास जामीनापासून वंचित राहावे लागेल, असा इशारा देत न्यायालयाने डॉक्टरांना अधिक संरक्षण पुरविण्याचीच भूमिका घेतली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामतीतील डॉ. राहुल जाधव यांच्या रुग्णालयात एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यानंतर शिवाजी जाधव या व्यक्तीने त्या ठिकाणी असलेल्या भूलतज्ज्ञ डॉ. सुजित अडसूळ यांच्यावर हल्ला करत हावभावही केले होते. या प्रकरणी अडसूळ यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी जाधव याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला होता. 

या प्रकरणी जाधव याच्या वतीने बारामतीतील जामीन फेटाळल्यानंतर  मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी या प्रकरणी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोरोना काळात डॉक्टरांनी केलेल्या कामाची प्रशंसा करत मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांचे काम अमूल्य आहे आणि त्यांच्या कामाचे मोल कायम लक्षात ठेवण्याजोगे आहे, असे नमूद केले. 

या प्रकरणी शिवाजी जाधव यांनी एक लाख रुपये अगोदर मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावेत, त्यानंतरच 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना न्यायालयाने जामीन मंजुर केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याचाही विसर पडू देता कामा नये...
कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणा-या व्यक्तींच्या नातेवाईकांचे दुःख आणि वेदना हे समजण्यासारखे आहे, मात्र त्याच वेळेस कोरोनाच्या काळात डॉक्टर, परिचारिका, इतर वैद्यकीय कर्मचारी वर्ग यांनी कोरोना वॉरीयर्स म्हणून जी निःस्वार्थ सेवा केली आहे, ती न विसरता येण्यासारखी आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले दुर्देवी आहेत, असे मतही मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी नोंदविले आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court orders to deposit Rs 1 lakh in CM Assistance Fund for bail