'बँकांची फसवणूक होत असल्याचा परिणाम गरीब जनतेवर होतोय'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

बँकांकडून देण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांमुळे व्यवसाय वाढत असून, रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

पुणे : बँकांकडून देण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांमुळे व्यवसाय वाढत असून, रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र, व्यावसायिकांकडून बँकांची फसवणूक होत असल्याच परिमाण गरीब जनतेवर होत आहे. ही बाब समाजास हानीकारक आहे, असे नमूद करीत केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) न्यायालयाने बँकेची फसवणूक करणाऱ्याला पाच वर्षे सक्तमजुरी आणि साडेपाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) विशेष न्यायाधीश पी. सी. भगुरे यांनी हा निकाल दिला. बनावट कागदपत्रे सादर करून साडेचार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेऊन बॅंक ऑफ महाराष्ट्र कर्वे रोड शाखेची फसवणूक करणाऱ्या नितीन मारुतराव काळे (वय 47, रा. बारामती) याला शिक्षा देण्यात आली.

काळेने बॅंक अधिकाऱ्यांच्या मदतीने कट रचून मॅक्‍स मल्टिकॉन या कंपनीच्या नावाने बनावट कागदपत्रे दाखल करून कर्ज मंजूर करून घेतले होते. या प्रकरणात नितीन प्रभाकर फरसोळे आणि अभिमन्यू भाऊराव शेंडगे यांची निर्दोष सुटका केली. सीबीआयचे विशेष सरकारी वकील अभयराज आरीकर यांनी खटल्याचे कामकाज पाहिले.

काळे हा मॅक्‍स मल्टिकॉन लिमिटेड कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. त्याने बॅंक ऑफ महाराष्ट्र कर्वे रोड शाखेमध्ये खाते काढून कर्जप्रकरण दाखल केले होते. त्यासाठी शेतजमीन गहाण ठेवली. मात्र ते बॅंकेच्या आरोपी अधिकाऱ्याने कोणतीही पाहणी न करता मंजूर केले. खटल्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

कर्जप्रकरणात बनावट कागदपत्रे वापरली. कर्जाची रक्कम मिळाल्यानंतर काळाने त्याचा गैरवापर केला. कर्ज मंजूर करून देणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर केला, असे सीबीआयने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court reaction on Bank Fraud issue